खंडित वीज पुरवठ्यामुळे उपकरणे जळत असल्याची केली तक्रार
मालवण दि प्रतिनिधी
गेले आठ दहा दिवस मालवण बाजार पेठेत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त बनलेल्या मालवणातील व्यापाऱ्यांनी मालवणच्या वीज वितरण कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे वीज उपकरणे जळली जात असल्याने या गोष्टीला जबाबदार कोण? वीज वितरणच्या कार्यालयात कर्मचारी फोन उचलत नाही तसेच तो कार्यालयीन वेळेत जागेवर नसतो या आणि इतर अनेक प्रश्नांचा भडीमार करीत वीज वितरणचे सहाय्यक अभियंता श्री. गुरूदास भुजबळ यांना जाब विचारला . यावेळी शहरातील वीज पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यात येईल त्याचबरोबर अन्य दुरुस्तीची कामे रविवारी करण्यात येतील असे आश्वासन उपस्थित व्यापारी वर्गाला श्री. भुजबळ यांनी दिले.
यावेळी व्यापारी संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, शहराध्यक्ष उमेश नेरूरकर, बाळू अंधारी, मेघनाद धुरी, साईश बांदेकर, कुलराज बांदेकर, यशराज तायशेटे, निहार सापळे, कुणाल मालवणकर, हेमंत शिरपुटे, सरदार ताजर, विद्या मेस्त्री आदि उपस्थित होते. सध्या मालवण शहरात पर्यटन हंगाम आहे. मालवण शहरात पर्यटकांची गर्दी असते. अशा परिस्थिीतीत मालवण बाजारपेठेतील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतो. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे व्यापारी वर्गाची उपकरणे जळाली आहेत. या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी अभियंता भुजबळ यांनी लवकरात लवकर मालवण बाजारपेठेतील वीजुपरवठ्याच्या समस्या दूर करण्यात येतील. तसेच बाजारपेठेतील दुरूस्तीची कामे रविवारी करण्यात येतील असेही स्पष्ट केले.
यावेळी कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. दिवसा उजेडी वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार का घडतात असा सवाल उपस्थित व्यापाऱ्यांनी विचारला. त्यावेळी विजेचे ग्राहक वाढले असल्याने विजेचा वापर मोठ्या प्रामानावर होत आहे. वीज वितरणकडे ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी जागा नाही असे भुजबळ यांनी सांगताच उपस्थित व्यापारी वर्गाने ट्रान्सफॉर्मर साठी तीन जागा सुचविल्या. येत्या दोन तीन दिवसात या जागांची पाहणी करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे म्हणाले, जून महिन्यात पावसाचे आगमन होते. मालवण किनारपट्टीला सातत्याने वादळांचा धोका असतो व भविष्यात तो राहणार आहे. त्यामुळे भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम होणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
