⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालुक्यातील साळिस्ते गावचे ग्रामदैवत श्री देव खांबेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार पुर्नप्रतिष्ठापना सोहळ्याला सोमवारी उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सोमवारी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात, देवतांच्या जयघोशात आणि भक्तिपुर्ण वातावरणात देवतांचे आगमन झाले. या मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री मठ संस्थान दाभोली येथील श्रीमत दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते 11मे रोजी संपन्न होणार आहे.
सोमवारी सकाळी 9 ते 11 वा. पर्यंत प्रायश्चित विधी व रूद्र याग त्यानंतर दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी 4 वा. नंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने देवांचे आगमन झाले. पारंपारिक पध्दतीने सजावट केलेल्या बैलगाडीने, ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि देवतांच्या घोषात भक्तिपुर्ण वातावरणात या देवतांचे साळिस्ते सीमेवरुन मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकी दरम्यान लाठीकाठीचा कार्यक्रमही झाला. मंगळवारी सकाळी 7 वा. मंगलाचरण, यजमान देवताना निमंत्रण महासन्कल्प, दु. 1 वा. पर्यंत गणेशपुजनादी-नांदि श्राध्दांत पुण्याहवाचन, आचार्यदी रुत्वीगवरण, आचार्यकर्म, मंडप प्रतिष्ठा, कौतुकबंध, शांती होम, गन्गापुजन, जलाधिवास, स्नानविधी, कार्य समाप्ती, दू. 1 वा. महाप्रसाद, संध्याकाळी 5 वा. स्थानिक शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर झालेत.
बुधवारी सकाळी 7 वा. मंगलाचरण, प्रकारशुध्दि, देवतांचा स्नानविधी, दुपारी 1 वा. पर्यंत ब्रम्हदिमंडलादी, देवतांची स्थापना, देवतान्चा शैय्याधिवास, अग्निस्थापना, गृहस्थापना, वास्तुहोम, ग्रहयज्ञपूर्वक प्रधान पर्याय होम, कर्म समाप्ती, दू. 1 वा. पासुन महाप्रसाद, संध्याकाळी 5 वा. सांस्कृतिक कार्यक्रम व स्थानिक भजने सादर झालीत.
गुरुवार 11 मे रोजी सकाळी 7 वा. मंगलाचरण, प्रकारशुध्दि, आवाहित देवतांची पूजा, अग्नीअर्चण, तत्वहोम, स. 8.50 मी. च्या शुभ मुहूर्तावर श्रीमत दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण सोहळा होणार आहे. त्यानंतर 9.32 मी. च्या मुहूर्तावर मुर्तिप्रतिष्ठापना तत्वन्यास, पूर्वक प्राणप्रतिष्ठापना, देवतांची महापुजा, महाबलिदान आणि महापुर्णाहुती, प्रतिष्ठा उत्तरांग विधी, अभिषेक, विभूतीवंदन, देवालय उत्सर्ग, युप स्थापना, कर्म समाप्ती होईल. त्यानंतर दू. 1 पासुन महाआरती, गार्हाणे, दू. 2 वा. महाप्रसाद, दू. 3 वा. देवीची ओटी भरणे व महिलांचे हळदी कुंकू, दू. 4 वा. मान्यवरांचा सत्कार समारंभ, रात्रौ 8 वा. महाप्रसाद, रात्रौ 9 वा. पासून बुवा उदय पारकर व बुवा संतोष मिराशी यांच्या डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन साळिस्ते ग्रामोत्कर्ष मुंबई, साळिस्ते ग्रामस्थ देवस्थान कमिटी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
