⚡मालवण ता.०९-: पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… हर हर महादेव… जय जय श्री देव गांगेश्वर… असा जयघोष करत आज राठीवडे येथील श्री देव सपरिवार गांगेश्वर देवालयाच्या संप्रोषण विधी व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिरावर आरोहण करण्यात येणाऱ्या कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने या सोहळ्याचा शुभारंभ झाला.
राठीवडे येथील श्री देव सपरिवार गांगेश्वर देवालयाच्या संप्रोषण विधी व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळ्यास आज पासून प्रारंभ होऊन ११ मे रोजी कलशा रोहणाचा मुख्य समारंभ होणार आहे. यानिमित्त श्री गांगेश्वर सेवा मंडळ (राठीवडे) मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त आज सकाळी लिंगेश्वर मंदिर महापूजा व त्यानंतर गांगेश्वर देवालयात तरंग देवतांना निरी लावणे आदी कार्यक्रम पार पडले. तर सायंकाळी ४ वाजता शिखर कलश प्रदक्षिणा(मिरवणूक) काढण्यात आली मठढवळ वाडी येथील बाळप्रकाश ठाकूर यांच्या निवासस्थानातून या मिरवणूकीस सुरुवात झाली. तेथून मुख्यमार्गे निघालेली ही मिरवणूक गावातील पुजारेवाडी, बांबरवाडी व पाताडेवाडी अशी प्रदक्षिणा करून गांगेश्वर मंदिराकडे विसर्जित झाली. ढोल ताशांच्या गजरात आणि श्री देव गांगेश्वराच्या जयघोषात काढलेल्या या रॅलीत देवस्थान मानकरी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी ठीकठिकाणी सुवासिनींनी व ग्रामस्थानी मिरवणूकीचे स्वागत करत कलशाचे पूजन केले.
या सोहळ्यानिमित्त दि. १० मे रोजी सकाळी ७:३० वा. प्रायश्चित्त, सकाळी ८:३० ते दुपारी ०१:३० पर्यंत साडेसतरा खेडयातील देवतांना निमंत्रण देणे, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, प्राकारशुद्धी, संप्रोक्षण विधी, जलाधिवास, ब्रह्मादि मंडल, बास्तूमंडल पूजन, अग्निस्थापना, नवग्रह पूजन ग्रहबारसूराण, मुख्यदेवतेसाठी व शिखर कलशासाठी हवन, लघुपूर्णाहुती, दुपारी १:३० वा. आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, संध्याकाळी ४:३० वा. ह.भ.प. कु. मृणाल मिलिंद गांवकर यांचे सुश्राव्य किर्तन, संध्याकाळी ७ वा. नवनियुक्त सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा विशेष सत्कार स्वयंसेवा संघ, राठीवडे आयोजित लकी ड्रॉ योजना सोडत कार्यक्रम, रात्री १० वा. सुस्वर भजने, दि. ११ मे रोजी सकाळी ८ वा. मंगलाचरण, प्राकारशुद्धी, आवाहित मंडल देवता पूजन, सकाळी १०: ०२ या मुहूर्तावर श्री. सदगुरू हेमंत मणेरीकर यांचे हस्ते श्री देव गांगेश्वर मंदिर शिखर कलश प्रतिष्ठापना विधी, तत्वहोम, प्रायश्चित्त होम, बलिदान, पुर्णाहुती, अभिषेक व सांगता, दु. १२.३० वा. आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायं. ५ वा. श्री गांगेश्वर कृपा या विशेषांकाचे प्रकाशन जयराम धुरी यांच्या हस्ते व बाळप्रकाश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत, सायं. ५.३० वा. मुंबई मंडळातील पदाधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ यांची मनोगते, सायं. ६.३० वा. ह.भ.प. किशोर साळुंखे ठाणे मुंबई यांचे कीर्तन, सायं. ७.३० वा. ह.भ.प. नामदेव तळवडकर ठाणे मुंबई यांचे प्रवचन, सायं. ८.३० वा. आमदार वैभव नाईक यांचा विशेष सत्कार, मान्यवर व माहेरवाशीणी यांचे सत्कार, रात्री १० वा. दशावतारी नाटक सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री गांगेश्वर सेवा मंडळ (राठीवडे) मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ राठीवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
