आव्हान स्वीकारल्यानंतर मंत्री केसरकर यांनी रडत बसू नये

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : युती कशाला पाहिजे मैत्रीपूर्ण लढण्याचा लगावला टोला

सावंतवाडी ता.०८-: केसरकर यांनी दिलेल आवाहन मी स्विकारीन. परंतु केसरकर यांनी वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन युतीसाठी रडत बसू नये, असा पलटवार भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केला. दरम्यान युती कशाला पाहिजे ? मैत्रीपूर्ण लढत लढू, असा टोलाही ही तेली यांनी यावेळी केसरकर यांना लगावला. श्री. तेली आज सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब,शहराध्यक्ष अजय गोंदावळे,मनोज नाईक,आनंद नेवगी,रवि मडगावकर,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

यावेळी तेली म्हणाले माझा दोनदा पराभव झाला तरी 2019 च्या निवडणूकीत पक्षाचा एबी फाॅर्म असता तर परिस्थिती वेगळीच असती, मात्र पराभव तर इंदिरा गांधींचाही झाला होता. त्यामुळे केसरकर तुम्ही गुर्मीत व घमेंडीत राहू नका. युतीची भाषा करण्यापेक्षा या येथे ‘स्पेशल केस ‘म्हणून मैत्रीपूर्ण लढा, एकदाच काय ते होऊन जाऊ दे, असे खुले आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज दिले आहे.

तर बांधकाम मंत्री भाजपचे असताना मंत्री केसरकर त्यांनाच आव्हान देत राजकारण सोडण्याची भाषा करतात. मंत्री चव्हाण यांच्यावर बोलताना केसरकर आणि विचार करावा सरकारमध्ये त्यांचे वजन का आहे याचा आधी विचार करावा आणि कुठलेही विधान करताना सांभाळून करावे असा इशाराही श्री तेली यांनी दिला.

श्री तेली पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदार संघात विकास सुरु आहे. ना. चव्हाण यांनी आपल्या कोट्यातील २४ टक्के निधी शिवसेनला दिला. मात्र, केसरकर पालकमंत्री असताना भाजपला किती निधी दिला तो त्यांनी जाहिर करावा.१९९० – ९१ पासून ताज ग्रुप ची जागा तसेच सिजा दी गोवा ची जागा पडून आहे. तुम्ही आमदार व मंत्री होता मग इथे काहीही का होऊ शकले नाही. नारायण राणे उद्योगमंत्री असताना आडाळी एमआयडीसी मंजूर केली. त्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या काळात एकही उद्योग का येऊ शकला नाही. बंद टाटा मेटॅलिक का सुरु झाली नाही. सातार्डा येथील उत्तम स्टीलचं काय झालं. आता कोणाला तरी हॅलिकॉप्टर मध्ये फिरवून लोकांची दिशाभूल का चालवली आहे.

श्री तेली पुढे म्हणाले, सावंतवाडी मतदार संघात युती न करता जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढवूया. यात ज्याचं प्राबल्य येईल त्याला संधी द्यावी. तुम्ही जिंकलात तर मी बाजूला होतो अन्यथा तुम्ही बाजूला व्हा, तुमची या मतदारसंघात ताकद होती तर मतदारसंघातील वेंगुर्ले सावंतवाडीसह दोडामार्ग नगरपालिका भाजपने कशी जिंकली. मतदार संघातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्वाधिक जागा भाजपच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतवर देखील भाजपचीच सत्ता आहे. सहकारातही आमचेच वर्चस्व आहे. तर मग विधानसभेच्या जागेवर हक्क कसला सांगता.पर्यटनाच्या माध्यमातून आंबोली, चौकुळ, गेळे त्याचप्रमाणे किनारपट्टीच्या भागाचा विकास व्हावा,
त्याचप्रमाणे आडाळी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page