आविष्कार फाऊंडेशनने केला सन्मान;साहित्यिक किसनराव कुराडे यांनी केला प्रदान
मालवण दि. प्रतिनिधी
अविष्कार फाउंडेशन च्या वतीने क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार, प्रा. कैलास रावते यांना देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील श्री क्षेत्र जोतिबा येथे प्रा. कैलास रावते यांना जेष्ठ साहित्यिक व समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक किसनराव कुराडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिक्षक आमदार जयंत आसगावकर, अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, उद्योजक संजय भगत, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, लेखक तथा कवी अरविंद मानकर, पत्रकार निवास मोटे, मुख्याध्यापक संघाचे संचालक सुरेश उगारे, अविष्कार फाउंडेशन दक्षिण भारत विभागीय अध्यक्ष उज्वला सातपुते, अविष्कार फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय सुर्यवंशी, तालुका अध्यक्ष शशिकांत म्हेतर आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने प्रा. कैलास राबते यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. अविष्कार फाउंडेशन इंडिया (कोल्हापूर महाराष्ट्र राज्य) ही सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत आहे. या फाउंडेशनच्या वतीने समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येतो, प्रा. राबते हे मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून गेली २३ वर्ष कार्यरत आहेत. एक विद्यार्थी प्रिय व अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. अध्ययन-अध्यापन कामाबरोबरच आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो हा उद्देश नजरेसमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून ते शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या परीने योगदान देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अविष्कार फाउंडेशनतर्फे जोतिबा रॉयल रिसोर्ट श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या भव्य दिव्य अशा दिमाखदार सोहळ्यात त्यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
