अविनाश शिरवलकर यांचे शैक्षणिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी:सुशिल गोसावी

⚡कणकवली ता.०३-: गावाकडची ओढ आणि शाळेबद्दल असणारी आत्मीयता जपत कर्तव्यदक्ष भावनेतून पुर्ण प्राथमिक शाळा शिरवल नंबर १ च्या शैक्षणिक प्रगतीसाठी वन्हा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबईचे व्यवस्थापक अविनाश शिरवलकर यांनी विद्यार्थ्यांची आणि शाळेची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी वन्हा इंटरनॅशनल प्रा.लि. कंपनीच्या सीआरएस फंडातून शिरवल शाळा नंबर १ शाळेला चार लाख चाळीस हजार रुपयांचा निधी देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांनी राबविलेले उपक्रम निश्चितच स्तुत्य आणि कौतुकास्पद आहेत.शिरवलकर यांचे शैक्षणिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.असे गौरवोद्गार मुख्याध्यापक सुशिल गोसावी यांनी काढले.
शिरवल शाळा नंबर १ येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर वन्हा इंटरनॅशनल प्रा .लि.कंपनी मुंबई चे डायरेक्टर शाईन मॅथ्यू, मॅनेजर अविनाश शिरवलकर, सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रविण तांबे, पोलिस पाटील विजय शिरवलकर, ग्रामपंचायत सदस्य सुचित गुरव, चैताली पांचाळ,बाळा सावंत,अजित सावंत, तुळशीदास कुडतरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सावंत, प्रशांत कुडतरकर,बाबु गुरव, राजेंद्र सावंत,अनिल शिरसाट,गणपत मर्गज, पांडुरंग मोरये दिलीप धामापुरकर,शितल राणे आदी उपस्थित होते

यावेळी श्री.गोसावी म्हणाले, अविनाश शिरवलकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.आणि एक चांगला पायंडा घालून दिला आहे.त्यांचा हा आदर्श गावातील ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

सरपंच गौरी वंजारे म्हणाल्या की,अविनाश शिरवलकर यांनी आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. शाईन मॅथ्यू आणि अविनाश शिरवलकर यांनी विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले असेही त्या म्हणाल्या.

प्रशांत कुडतरकर म्हणाले की,वन्हा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने आज आपल्या शाळेसाठी दोन लोखंडी कपाट, संगणक संच, संगणक कक्ष,स्पिकर, फॅन, स्वच्छता गृह व शौचालय, वॉटर कुलर, ओपन ग्राउंड स्टेज,व शेड,आदी शैक्षणिक साहित्यासाठी चार लाख चाळीस हजार रुपये निधी उपलब्ध करुन साहित्य देऊन शैक्षणिक प्रगती साधली आहे..

उपसरपंच प्रविण तांबे म्हणाले, आपल्या गावचे सुपुत्र अविनाश शिरवलकर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि उन्नती व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.याबद्दल त्यांचे आम्ही कौतुक करतो.त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
अविनाश शिरवलकर म्हणाले की,या शाळेचे आणि गावाचे आम्ही देणे लागतो.आम्हाला दिलेले संस्कार आणि प्रेम आम्ही विसरू शकत नाही.गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य मिळावे आणि त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी आम्ही ही शैक्षणिक मदत दिली आहे.आपल्या गावातील विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या प्रगतीसाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत.त्या उपलब्ध करण्यासाठी यापुढे हि प्रयत्नशील राहु.अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

अविनाश शिरवलकर आणि शाईन मॅथ्यू यांचा शिरवल शाळा नंबर १ च्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन उपसरपंच प्रविण तांबे आणि सरपंच गौरी वंजारे यांच्या हस्ते मुख्याध्यापक सुशिल गोसावी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page