नरेंद्र पाटील:अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या कामकाजाचा घेतला आढावा
ओरोस ता.२७-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान चार ते पाच हजार मराठा समाजाला कर्ज वितरण होणे अपेक्षित होते. मात्र, २१५ जणांना कर्ज वाटप झाले आहे. एकूण १६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असून एक कोटी ४४ लाख रुपयांचा परतावा महामंडळाकडून देण्यात आला आहे. वाटप झालेल्या कर्जातील ९ कोटी ५० लाख जिल्हा बँकेने १८० जणांना कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांचा मराठा समाजाला कर्ज वाटप करण्यासाठी सहभाग दिसत नाही, अशी नाराजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज बोलताना व्यक्त केली.
श्री पाटील आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात लाभार्थ्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी आ नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पाटील यांनी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुनरस्थापना करण्यात आली होती. आता पुन्हा या मंडळाची जबाबदारी माझ्याकडे दिल्यानंतर आपण जिल्हा निहाय दौरे करीत आहोत. मराठा समाजात जास्तीत जास्त उद्योजक बनावे, यासाठी महामंडळाच्या माध्यमातून कर्ज अनुदान, परतावा दिला जातो. आतापर्यंत ५८ हजार जणांना ४ हजार १५२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. अलीकडे यात सुधारणा करण्यात आली आहे. वयोमर्यादा वाढविण्यात आली असून कर्ज रक्कम ५ लाखापासून देण्यात येत आहे. केवळ प्राथमिक मागणी पूर्ण केल्यावर दोन लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे, असे यावेळी बोलताना पाटील म्हणाले.
