पालकमंत्री रवींद्र चव्हाण : बागायतदार शिष्टमंडळाने भेट घेत मांडले मुद्दे, पुढील काजू हंगामात 180 रुपये हमीभाव मिळणार
⚡बांदा ता.२४-: शेतकरी काजू बागायतदारांनी काजूला मागितलेला 180 रुपये हमीभाव देण्यावर निश्चितच निर्णय घेतला जाईल. अन शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे दर मिळेल. तसेच काजू फळ बोंडू यावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. यामुळे काजू बोंडूला किलोमागे किमान सात रुपये दर मिळणार. त्यामुळे एक वेगळी आर्थिक क्रांती सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा काजू शेतकऱ्यांसाठी होईल, असे सूतोवाच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
काजू बागायतदार शिष्टमंडळाने सावंतवाडी येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. यावेळी श्री. चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी अध्यक्ष विलास सावंत यांनी सांगितले. यावेळी संचालक नितीन मावळणकर, चंद्रशेखर देसाई, शेतकरी व फळ बागायतदार संघाचे पदाधिकारी सर्वस्वी गोपाळ करमळकर, श्री. मुरुडकर व जनार्दन नाईक इत्यादी उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, काजू संदर्भात मागील महिनाभर सरकार गांभीर्याने चर्चा करीत आहे. अनेक विषयांवर पर्यायीही शोधून काढलेले आहेत. यंदाचा हंगाम संपत आल्याने काही निर्णय घेऊ शकत नाही, परंतु पुढचा काजू हंगाम सुरू होण्यापूर्वी आपल्याला ठोस निर्णय घेतलेले दिसतील. काजूला 180 रुपये हमीभाव देण्यावर निश्चितच निर्णय घेतला जाईल. काजू फळ बोंडू यावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येईल.
कारखानदारांच्या मागणी एवढा पुरवठा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र किंवा भारतातून होत नसल्याने आयात प्रक्रिया ही सुरूच ठेवावी लागेल. मात्र त्यावर केंद्र शासनाला विनंती करून आयात कर वाढविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. भाजपा सरकार काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात सकारात्मक आहे. लवकरच काजू विषयावर एक चर्चात्मक शिबिर आयोजित करून अनेक ठोस निर्णय घेतले जातील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे विलास सावंत यांनी सांगितले.
