⚡कणकवली ता.२४-:
शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीला एच.पी.सी.एल. कंपनीच्या दातृत्वाबद्दल व देणगी मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असलेले एच.पी.सी.एल. कंपनीचे डेप्युटी मॅनेजर ( गोवा ) रोहित कटियार यांचा शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे हे विद्यामंदिर हायस्कूलचे माजी विद्यार्थी या नात्याने शाळेला नेहमीच विविध प्रकारे मदतीचा हात देत असतात. एच.पी.सी. एल. या कंपनीत त्यानी भरीव कामगिरी केली आहे.त्याचीच पोचपावती म्हणून एच. पी. सी. एल. कंपनीतर्फे विद्यामंदिर प्रशाला कणकवलीला 55 सिलिंग फॅन व फर्निचरसह आठ संगणक (सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचे साहित्य) प्राप्त करून दिले आहे. या आधीही त्यांनी कणकवली कॉलेजला एक संगणक कक्ष व एच.पी.सी.एल. हॉल बांधून दिला आहे. तसेच कॉलेजच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव बाळासाहेब वळंजू,विश्वस्त अनिलपंत डेगवेकर, सदस्य अनिल म्हाडगूत, देणगीदार आनंद अंधारी, प्रशालेचे मुख्याध्यापक भारत सरवदे, माजी मुख्याध्यापक हेमंत खोत हे उपस्थित होते.
यावेळी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे, प्रयोगशाळा सहाय्यक राजेंद्र तवटे आणि प्रशालेचे माजी मुख्याध्यापक हेमंत खोत यांनी प्रशालेच्या प्राथमिक विभागाला अनुदान मिळवून देण्यासाठी भरीव योगदान दिले. तसेच इंग्रजी विभागाला मान्यता मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली तर्फे तिघांचाही सत्कार करण्यात आला.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे म्हणाले की ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेसाठी एच. पी. सी.एल. कंपनीच्या माध्यमातून भरीव योगदान देता आले याबद्दल मला गर्व आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन स्वतःची प्रगती करून आपल्या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी त्यांनी एच.पी.सी.एल. सारख्या जागतिक स्तरावरील कंपनीत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल अभिमान वाटतो असेही सांगितले
तसेच याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोहित कटियार यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की ज्या सुविधा तुम्हांला दिल्या आहेत त्यांचा योग्य वापर करा, तंत्रज्ञान शिकून घ्या आणि शाळेच्या व देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचला. शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे यांनी सांगितले की प्राथमिक शिक्षण हेच जीवनात महत्त्वाचे असते. एच. पी. सी. एल.ने जी देणगी दिली आहे त्यामुळे प्रत्येक वर्गात चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे आणि शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही मिळाली आहे. याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून स्वतःची शैक्षणिक प्रगती केली पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्रशालेचे मुख्याध्यापक भारत सरवदे यांनी शाळेला बहुमोल देणगी मिळवून दिल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाला एच. पी.सी. एल. चे अधिकारी प्रदीप राणे, श्री. देसाई तसेच कणकवली कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक महालिंगे, पर्यवेक्षक श्री.कांबळे तसेच प्रशालेचे इतर शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थीही उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.सी. सिंगनाथ व आभार प्रदर्शन अच्युतराव वणवे यांनी केले.
