शालेय शिक्षण विभागाकडून पोषण आहारासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त

समितीत नितीन वाळके यांचा समावेश

⚡मालवण ता.१७-: राज्यातील शाळांमध्ये पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीपासून आता विद्यार्थ्यांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पोषण आहारामध्ये स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्ये, अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी, सध्याच्या पाककृतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली असून यात सदस्य म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघांचे कार्यवाह नितीन वाळके यांची निवड करण्यात आली आहे.

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत संदर्भात शासन निर्णयान्वये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या पाककृतीची निश्चिती करण्यात आली आहे. मागील काही वर्षामध्ये प्रसिध्द झालेल्या अनेक आरोग्य विषयक अहवालामधून विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण कमी असणे, विद्यार्थ्यांचा Body Mass Index (BMI) कमी / जादा असणे आदी बाबी निदर्शनास आल्या आहेत. तसेच केंद्र शासनाने योजनेंतर्गत स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने प्रस्तुत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थाचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृध्दीगत करण्याच्या दृष्टीने याबाबत शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीच्या समितीचे गठन करणे आवश्यक आहे. सदर समितीच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक व सकस आहार देण्यासाठी प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पाककृतीमध्ये सुधारणा करता येणे शक्य आहे. त्यानुसार नमूद क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून गठीत करण्यात आली आहे.

या समितीमध्ये सदस्या म्हणून मालवण मधील हॉटेल उद्योजक आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या समितीचे अध्यक्ष राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक आहेत तर सदस्या सचिव म्हणून प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राज्य समन्वय अधिकारी देविदास कुलाळ हे आहेत. सदस्य म्हणून विष्णू मनोहर (सुप्रसिध्द शेफ), उज्वल नागेश्वर (अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ) प्रसाद कुलकर्णी (आघारकर संशोधन संस्था, पुणे), श्रीम. पुनम कदम (आहार तज्ज्ञ, ग्रामीण रुग्णालय, बारामती), डॉ. अर्चना ठोंबरे, (पोषण तत्ज्ञ, पुणे), महाराष्ट्र हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरींग टेक्नॉलॉजी संस्था पुणे यांचे प्रतिनिधी तसेच श्री. वैभव बारेकर (अधिक्षक, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, गडचिरोली) यांची निवड करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार अधिक पौष्टिक, रुचकर आणि दर्जेदार होण्यासाठी वेगवेगळ्या पाककृती सुचवणे, पाककृतीतील धान्यादींचे प्रमाण निश्चित करून देणे, विद्यार्थ्यांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढणे आणि ‘बॉडी मास इंडेक्स’ सुधारण्याच्या दृष्टीने आहाराच्या बदलाबाबत उपाययोजना सुचवणे, स्थानिक पातळीवरील अन्नधान्य, भाज्या, फळे आदींवर आधारित पाककृतींचा समावेश करण्याबाबत शिफारस करणे आदी बाबींचा विचार करून धोरणात्मक उपाययोजना सुचवणे अशी या समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page