शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे महात्मा फुलेंचे तत्वज्ञान रुजणे आवश्यक – प्रा. नागेश कदम

⚡मालवण ता.१५-: भारतातील तमाम महिला वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणामध्ये मूलभूत सुधारणा आवश्यक आहेत. समाजाच्या बदलणाऱ्या गरजांबरोबर यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. स्त्रियांचा विकास म्हणजे देशाचा विकास, हा मुलमंत्र क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिला. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे महात्मा फुलेंचे तत्वज्ञान रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. नागेश कदम यांनी केले.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. कदम हे बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. ज्योस्त्ना पडियार, सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, उपायुक्त प्रमोद जाधव, संशोधन अधिकारी सचिन साळे आदी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा. नागेश कदम यांनी महात्मा फुले यांचे जीवन व कार्य या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रथम स्वतःच्या पत्नीला शिकवून शिक्षणाचे महत्व पटवून दिले. परंपरागत चालीरिती, रूढी, अंधश्रद्धा यांना छेद देण्याचे महान कार्य महात्मा फुले यांनी केले. फुले यांनी शेतकऱ्यांचा आसुड या पुस्तकामधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, असे कदम यांनी सांगत महिलांसाठी फुलेंनी केलेल्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी वर्ग, व इतर मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page