⚡बांदा ता.१४-: न्हावेलीत गव्यांनी शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या भर वस्तीत गव्यांच्या कळपाकडून शेतीत शिरल्याने बागायतीचे लाखोंचे नुकसान झाले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात सर्रासपणे गव्यांचा वावर होत असल्याने वनविभाग याकडे लक्ष कधी देणार असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे.
न्हावेली (विवरवाडी) येथे सध्या गव्या रेड्यानी शेतकरी, बागायतदार यांची झोपच उडविली आहे. गव्यांचा कळप गावातील शेती बगायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. मंगळवार रात्री मोहन पालेकर यांच्या बागेतील दोन वर्षांची सुमारे २५ सुपारीची झाडे व काजू कलमांची गवारेड्यांनी अक्षरशः मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. तसेच आजू बाजूच्या शेतकऱ्यांच्या बागायतीचे पण नुकसान केले. त्यामुळे संबंधित खात्यातील अधिकाऱ्यानी या गव्यांचा बंदोबस्त करून झालेले नुकसान मिळावे अशी मागणी शेतकरी बागायतदार तसेच ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.