सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी तालुक्यातील चराठा येथील कामाक्षी नायर यांच्या बंद बंगल्यात चोरी केल्याप्रकरणी मंजुनाथ कृष्णा नायर, व्यंकटेश नायर, अय्यप्पा मनी नायर, चित्रा राजा नायर सर्व रा. चराठा यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी ॲड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.
यातील फिर्यादी कामाक्षी या आपल्या नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे हुबळी-कर्नाटक येथे गेल्या होत्या. यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत संबंधितांनी प्रॉपर्टीची कागदपत्र असलेली फाईल, मिलर मधील दोन हजार रुपयाची चिल्लर, तीन हजार रुपये किमतीचा तांब्याचा हंडा, देवाऱ्यातील समई व एक हजार किमतीच्या चांदीचे पैजण व बाळे असा मुद्देमाल चोरला असल्याचा यांच्यावर आरोप आहे. ही चोरी घराच्या मागे असलेल्या लोखंडी पत्र्यावरून चढून व मागील दरवाजाची कडी काढून केल्याचा नायर यांनी आरोप केला होता. याप्रकरणी त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयाकडे धाव घेतली होती. त्यानुसार त्यांना १५ हजाराचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
