राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान

⚡मालवण ता.२९-: राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ सिंधुदुर्ग शाखे मार्फत सन २०२२- २३ चे राज्यपुरस्कार पटकविणारे तळेबाजार हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री.रघुनाथ (नंदन) घोगळे व सावित्री माई फुले राज्यपुरस्कार पटकविणाऱ्या वैभववाडी येथील सांगुळवाडी नं. १ शाळेच्या शिक्षिका सौ.स्नेहलता राणे यांना जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, ओरोस येथे आयोजित गौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या गौरव सोहळ्याला राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघांचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत, राज्यकार्याध्यक्ष दशरथ शिंगारे, विभागीय कार्याध्यक्ष आनंद जाधव, जिल्हाकार्याध्यक्ष जयदेव सारंग, जिल्हा कोषाध्यक्ष उदय गोसावी, प्रसिद्धी प्रमुख शामसुंदर सावंत, प्राध्यापक जगदिश राणे इत्यादी मान्यवर व राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते.

या सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांनी स्वागत केले. प्रास्तविक दशरथ शिंगारे यांनी केले. यावेळी शिवराज सावंत यांनी वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ सिंधुदुर्ग या संघटनेच्या कामाची माहिती देऊन शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबवून मार्गदर्शन करण्यात येईल, असे सांगितले.

राज्य पुरस्कार पटकविणाऱ्या पहिल्या महिला शिक्षक ठरलेल्या स्नेहलता राणे यांनी सकारात्मकतेने काम केल्यास यश मिळते, पुरस्कारातून कामाची पोचपावती मिळण्याबरोबरच आत्मविश्वस वाढतो, असे सत्काराला उत्तर देताना सांगत सन्मानाबद्दल आभार मानले. तर पर्यावरण संवर्धन क्षेत्रातही काम करणारे रघुनाथ घोगळे यांनीही या सन्मानाने काम करण्यास अधिक प्रोत्साहन मिळाल्याचे सांगत आभार मानले.

यावेळी तसेच सेवानिवृत्त झालेले संघटनेचे सदस्य राजाराम बिडकर व औदुंबर भागवत यांनाही सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामसुंदर सावंत यांनी केले. तर आभार जयदेव सारंग यांनी मानले.

You cannot copy content of this page