माजी मुख्याध्यापक बी एन तेली
बांदा/प्रतिनिधी
शिक्षकाने आताच्या काळात स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे तरच आजच्या विद्यार्थ्यांचे समाधान तुम्ही करू शकाल. नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षक व शिक्षण संस्थांनी समाजाभिमुख होऊन आधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक बी. एन. तेली यांनी येथे केले.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या शिक्षण संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा बांदा येथील खेमराज प्रशालेच्या व्यासपीठावर संपन्न झाला. आदर्श काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, सेवक आणि शाळा यांचा संस्थेकडून दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
यावेळी गुरुवर्य व्ही. एन. नाबर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार संस्थेच्या भेडशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक, आदर्श शिक्षक पुरस्कार सुहास वराडकर (मडूरा हायस्कूल), आदर्श लिपिक पुरस्कार भिवा जाधव (बांदा हायस्कूल) आदर्श सेवक पुरस्कार संजय बांदेकर (परेल हायस्कूल) आणि आदर्श शाळा पुरस्कार शिवछत्रपती मध्यामिक विद्यालय असनिये हायस्कूल यांना देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, संस्था सचिव कल्पना तोरसकर, समन्वय समिती सचिव सौ. रश्मी तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक अन्वर खान, मेजर देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत असताना संस्था कायम तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी दिले. आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त असनीये हायस्कूलचे मुख्याध्यापक कैलास जाधव यांनी मी संस्थेचा सेवक ही भावना मनात ठेऊन विद्यार्थी व शाळेच्या हितासाठी उत्साहाने सतत कार्यरत राहण्याचा मंत्र उपस्थितांना दिला. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थीत राहिलेल्या मेजर देसाई यांनीही आपले अनुभव आणि भावना या प्रसंगी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रश्मी नाईक व रणवीर रणसिंग यांनी केले. आभार बांदा हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक नंदकिशोर नाईक यांनी मानले.
