सामाजिक संस्थांनी शिक्षणमंत्री केसरकर यांचे मानले आभार
⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला अखेर औषध पुरवठा उपलब्ध झाला आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून हा औषध पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. याबाबत संबंधित सामाजिक संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत. गेले काही दिवस कुटीर रुग्णालयात महत्त्वाची औषधे नसल्यामुळे अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. पुरवठा नसल्यामुळे समोर त्या ठिकाणी सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना बाहेरून औषधे लिहून द्यावी लागत होती.
याबाबत पत्रकारांनी श्री. केसरकर यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. आज हा औषध पुरवठा करण्यात आला, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सामाजिक बांधिलकी, युवा रक्तदाता संघटना व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान या संघटनांच्या वतीने काल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन औषधांच्या तुटवड्या बाबत चर्चा करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर केसरकर यांच्याशी संपर्क साधून सुद्धा लवकरात लवकर रुग्णांची होणारी गैरसोई दूर करा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर २४ तासांच्या आत दखल घेऊन केसरकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून औषध पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे आता गोरगरीब व मध्यमवर्गीय रुग्णांची महागड्या औषधाकरवी होणारी आर्थिक ओढाताण थांबणार आहे. यासाठी वरील सामाजिक संघटनेंनी विशेष ताकद लावून प्रयत्न केले होते. आणि त्यांच्या या प्रयत्नाला आज खूप मोठे यश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आज सर्व प्रकारची औषधे उपलब्ध झालेली आहे. आणि ती पुढेही कमी पडणार नाही याची ग्वाही श्री. केसरकर यांनी दिली. यासाठी केसरकर यांचे शहरवासी, ग्रामीणवासी, व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्यावतीने विशेष आभार मानण्यात आले आहेत.
