विकास वराडकर द्वितीय, तर पार्थ मेस्त्री तृतीय
⚡मालवण ता.२३-: मालवण येथील श्री रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे गुढीपाडवा उत्सव व हिंदू नववर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत कट्टा येथील समीर चांदरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विकास वराडकर यांनी द्वितीय आणि पार्थ साईनाथ मेस्त्री या शालेय विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रांगोळी स्पर्धेचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. दोन दिवस कलाकारांनी सहभाग घेत अनेक आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या. यात उत्तेजनार्थ म्हणून प्रफुल्ल गोसावी आणि श्रेया चांदरकर यांचीही निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून रूपेश नेवगी आणि बी. जी. सामंत यांनी काम पाहिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील विलास रहाटे यांना या रांगोळी स्पर्धेबद्दल माहिती मिळताच त्यांनी मंडळाचे अध्यक्ष सदा चुरी यांच्याशी संपर्क साधून स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची विनंती केली. मात्र ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असल्याने रहाटे यांना सहभाग घेता आला नाही. मात्र, त्यांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांनी रहाटेंना प्रदर्शनीय रांगोळी रेखाटण्याची सूचना केली. रहाटे यांनी काही दिवसांपूर्वी निधन झालेले सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे माजी अध्यक्ष कै. रामचंद्र महादेव तथा दादा आचरेकर यांचा चेहरा रेखाटून त्यांना श्रद्धांजली वाहिली. दादा आचरेकर यांच्या चेहऱ्याची हुबेहुब प्रतिमा रेखाटल्याने त्यांचे सर्वांनीच कौतुक केले. आचरेकर कुटुंबियांनीही प्रदर्शनाला भेट देत रहाटे यांच्या कलेचे कौतुक केले.
सत्यनारायण पूजेचे आकर्षक मकर
मालवण सोमवार पेठ येथील रामेश्वर मांड येथे दरवर्षी गुढीपाडव्यानिमित श्री सत्यनारायण महापूजा बांधण्यात येते त्यासाठी बनविण्यात येणारे मखर हे आकर्षक असते यावर्षीही सुप्रसिद्ध मखरकार आणि सजावटकार सदा चुरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद मेस्त्री ,दिलीप वायंगणकर आणि सहकाऱ्यांनी सात फूट उंच आणि चार फूट रुंद अशा आकाराची मखर स्वरूपात तुळस बनविली हे मखर मालवणात एक चर्चेचा विषय बनले होते ते पाहण्यासाठी लोकांनी आजही एकच गर्दी केली होते
