पतंजली योगसमितीचे आयोजन
बांदा ता.२२-:हिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधून बांदा पतंजली योग समितीतर्फे बांदा शहरात योग प्रभात फेरी काढण्यात आली. सर्वसामान्य लोकांपर्यंत योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार याबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने या योग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रभात फेरी मध्ये पतंजली योग समिती बांदाचे सर्व योग साधक आणि बांदा शहरातील इतर सर्व नागरिक यांनी सहभाग घेतला. ही प्रभात फेरी श्री देव बांदेश्वर मंदिर बांदा येथून सकाळी सात वाजता निघाली. नंतर छत्रपती संभाजी महाराज चौक, गवळी तिठा, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी ग्रामपंचायत इमारतच्या मार्गे पुन्हा श्री बांदेश्वर मंदिर येथे येऊन या योग प्रभात फेरीची सांगता झाली.
या योग प्रभात फेरी मध्ये ‘करे योग रहे निरोग’ या जयघोषाचा उल्लेख होता. योग ही आपली संस्कृती आहे आणि योगाभ्यास करणे व इतरांना करावयास लावणे हे कार्य पतंजली योग समिती बांदा ने हाती घेतले आहे व या कार्याला सर्वच स्तरावर प्रतिसाद वाढत आहे.
