कर्नाटकच्या चंदन तस्करिचे दोडामार्ग कनेक्शन ?

फरार आरोपीस घेतले दोडामार्ग -गोवा सीमेवरून ताब्यात ;कर्नाटक पोलीसांची कारवाई ; स्थानिक मात्र अनभिज्ञ

⚡दोडामार्ग ता.२२-: चंदन तस्करी प्रकरणात संशयित म्हणून हव्या असलेल्या फरार आरोपीच्या शनिवारी मध्यरात्री कर्नाटक पोलिसांनी दोडामार्ग येथे येऊन मुसक्या आवळल्या .आंनद मारुती रामणनवर (वय -२९ ) असे त्याचे नाव असून तो बिदरभावी (ता.खानापूर) येथील रहिवासी आहे. दोडामार्ग मध्ये तो सेन्ट्रीग कामगार म्हणून एका परप्रांतीय ठेकेदाराकडे गेल्या दोन महिन्यांपासून काम करत असल्याचे समजते.
दरम्यान या कारवाई बाबत स्थानिक पोलीस मात्र अनभिज्ञ असून याबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
याबाबत कर्नाटक पोलिसांच्या खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर गुन्हा दाखल असून कर्नाटक अधिनियम1963 नुसार चंदन तस्करीप्रकरणी तो पोलिसांना हवा होता. दोडामार्ग येथे तो राहत असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक बसवराज लमाणी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एच. श्रीनिवासन , एन.बी .बेळवडी ,एन.एम.मुल्ला ,यू.बी शिंत्री यांच्या पथकाने दोडामार्ग -गोवा राज्याच्या सीमेवर भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आनंद रामणनवर याच्या शनिवारी रात्री ११ वा. च्या सुमारास सापळा रचून मुसक्या आवळल्या. दरम्यान पोलिस तपासात त्याच्याकडे पाच किलो चंदनही पोलिसांना सापडले असल्याचे समजते.

You cannot copy content of this page