⚡मालवण ता.२१-: क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा केवळ आपणच घेऊ शकतो असे काहींना वाटते, मात्र आम्हीही भव्य दिव्य अशी भगवा चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करून ती सर्व शिवसैनिकांच्या सहकार्याने यशस्वी केली. या स्पर्धेमुळे भगवे वातावरण निर्माण होऊन शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
या पत्रकार परिषदेस शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, यशवंत गावकर, बाबू वाघ, दत्ता पोईपकर, अक्षय भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, भगवा चषक क्रिकेट स्पर्धा चांगल्या प्रकारे हाताळून यशस्वी केल्याबद्दल आपण सर्व शिवसैनिकांचे अभिनंदन करतो. स्पर्धा घेण्यास खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, संदेश पारकर, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट आशा नेत्यांनी आम्हाला ताकद दिली. शिवसैनिकांच्या आपण पाठीशी आहोत असा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संदेश या स्पर्धेवेळी अरुण दूधवडकर यांनी दिला, असेही खोबरेकर म्हणाले.
भगवा चषक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आपण आभारी आहोत. स्पर्धेनंतर आम्ही बोर्डिंग मैदानावर स्वच्छता मोहीम राबवून मैदान स्वच्छ केले. काहीजण फक्त फोटोसाठी स्वच्छता मोहिमा राबवितात. यापुढे मालवणातील तरुणांना रोजगार मिळवून देणे व पर्यटन वाढीतून मालवणला वैभव प्राप्त करून देणे यासाठी आम्ही काम करणार आहोत. बोर्डिंग मैदानाचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्नही आम्ही करणार आहोत, असेही हरी खोबरेकर म्हणाले.