⚡वेंगुर्ले ता.१४-: सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वीच्या दराने पेन्शन लागू करावी या मागणीसाठी वेंगुर्ले तालुक्यातील विविध आस्थापनावरील सुमारे ९५ टक्के राज्य कर्मचारी संपावर गेल्याने येथील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. प्रत्येक कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दूरवरुन कामासाठी आलेल्या अनेक लोकांना त्यांचे काम न होताच परत जावे लागले.
वेंगुर्ले तहसिल कार्यालयातील एकुण ४४ कर्मचाऱ्यापैकी ३५ संपावर, ४ रजेवर तर ५ हजर होते. वेंगुर्ले न. प. तील एकुण ४४ कर्मचाऱ्यापैकी दोन आस्थापनेवरील कर्मचारी व मुख्याधिकारी वगळता इतर ४१ कर्मचारी संपावर होते. वेंगुर्ले पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील एकुण ३२८ कर्मचाऱ्यांपैकी ३०५ संपावर होते. तालुक्यतील १३३ पैकी १४ शाळा सुरु होत्या. पंचायत समितीच्या इतर विभागातीलही बहुतांश कर्मचारी संपावर गेले आहेत.
तालुक्यातील विविध आस्थापनामधील सुमारे ९५ टक्के कर्मचारी संपावर गेल्याने सेवा विस्कळीत झाली. संपाची कल्पना नसल्याने कामासाठी ग्रामीण भागातून आलेल्या अनेक लोकांना काम न होताच परत जावे लागले. उद्या दहावीचा पेपर आहे. परिक्षेसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांपैकी कोणीही आपण संपावर जाणार असल्याचे केंद्रप्रमुखांना कळविले नाही त्यामुळे वेंगुर्लेतील दहावीच्या परिक्षेवर या संपाचा परिणाम होणार नसल्याचे वेंगुर्ले पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी सांगितले.
वेंगुर्ले तालुक्यातील ९५ टक्के कर्मचारी संपावर गेल्याने सेवा विस्कळीत.
