“बस हुई महंगाई की मार, नही चाहिए मोदी सरकार”

मालवणात ठाकरे गटाकडून ‘खिचडी पकाव’ आंदोलनातून सरकारचा निषेध

⚡मालवण ता.०३-: बस हुई महंगाई की मार, नही चाहिए मोदी सरकार… फडणवीस -शिंदे भाई है, महाराष्ट्र मे महंगाई छाई है… अब की बार महंगाई की मार… मोदी सरकार हाय हाय… गॅस दरवाढीचा निषेध असो… अशा घोषणा देत आणि लाकडानी पेटवलेल्या चुलीवर खिचडी शिजवत आज मालवणात शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गॅस दरवाढ व महागाई विरोधात राज्य व केंद्र सरकारचा निषेध करून ‘खिचडी पकाव’ आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, राज्य व केंद्र सरकार या दोघांनीही महागाईने सामान्य जनतेचे हाल केले असून पुढील काळात हे आंदोलन अधिक व्यापक केले जाईल असा इशारा यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

मालवण येथील शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेसमोर खिचडी पकाव आंदोलन छेडण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला आघाडीच्या पूनम चव्हाण, सेजल परब, शिल्पा खोत, तृप्ती मयेकर, निनाक्षी मेतर, विद्या फर्नांडिस, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, सन्मेष परब, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, उमेश मांजरेकर, भगवान लुडबे, नरेश हुले, सिद्धेश मांजरेकर, यशवंत गांवकर, गौरव वेर्लेकर, दत्ता पोईपकर, आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर म्हणाले, राज्यातील गद्दार सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांनी महागाई वाढवून जनतेचे हाल केले आहेत. २०१४ पासून गॅस सिलेंडरची किंमत तिप्पट वाढली आहे तर पेट्रोलचे भावही गगनाला भिडले आहेत. उद्योग, रोजगार याची केवळ आश्वासने देऊन दुसरीकडे महागाई वाढवली जात आहे. अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर सरकार काहीच बोलत नाही. महाराष्ट्रावर बोलणाऱ्या इतरांचा सत्कार करायचा आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणायचा असे करून सरकार महागाई पासून जनतेचे लक्ष विचलित करू पाहत आहे, असेही खोबरेकर म्हणाले.

महागाईने जनतेचे जगणे मुश्किल बनले आहे. जनतेला पुन्हा चुली पेटवाव्या लागणार आहेत. म्हणूनच आज आम्ही चुलीवरील खिचडीचे आंदोलन छेडत निषेध केला. मोदी सरकारने गॅस योजना राबवून घरघरात गॅस सिलेंडर दिल, मात्र त्याच गॅस द्वारे लूट करून सरकार तोंडातील घास हिरावून घेणार याची कल्पना जनतेला नव्हती. मात्र आम्ही सरकारच्या गळ्याचा फास आवळल्याशिवाय गप्प बसणार नाही, आजचे आंदोलन यापुढेही व्यापक प्रमाणात करून सरकारच्या विरोधात जिल्हाभरात रान पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही यावेळी हरी खोबरेकर यांनी दिला.

यावेळी नितीन वाळके म्हणाले, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजपचे मोदी सरकारचे पितळ आज महागाईचा आगडोंब उसळल्याने उघडे पडले आहे. पेट्रोल, गॅस सिलेंडर व वीज यांच्या दरवाढ जनतेच्या सहनशीलते पलीकडची आहे. महागाईतून सरकारने शेतकरी आणि गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. व्यापक स्वरूपात आंदोलन पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही वाळके म्हणाले.

You cannot copy content of this page