बांदा/प्रतिनिधी
बांदा-गवळीटेंबवाडी येथील भाऊ वळंजु घर ते पाटकर बाग कॉर्नर हा जवळपास १०० मीटरचा रस्ता हा पुर्णपणे वाहुन गेल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वेळोवेळी कल्पना देऊनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील ग्रामस्थांनी वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गेली तीन-चार वर्षे तेथे रस्ताच अस्तित्वात नाही अशी अवस्था आहे. रस्ता पूर्णपणे खराब होऊन केवळ खडी शिल्लक राहिलेली आहे, त्यामुळे त्यावरून जाताना बरेच किरकोळ स्वरूपाचे अपघात नेहमीच होत असतात. याबाबत येथील नागरीकांनी अनेकदा वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली पण गेली दोन वर्ष त्याच्यावर काहीच हालचाल करण्यात आली नाही. आता पावसाळा तोंडावर आल्याने जर आता या रस्त्याचे काम न झाल्यास तेथील नागरीकांना तेथुन ये-जा करणे देखील शक्य होणार नाही.
हा रस्ता वाफोली येथील तीन वाड्यांमध्ये जाण्यासाठी महत्त्वाचा जोडरस्ता असल्याने सदर काम त्वरित होणे अतिशय गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. यामुळेच येथील नागरिकांमध्ये प्रचंड रोष असुन, पावसाळ्यापूर्वी सदर काम न झाल्यास येथील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थ भाऊ वळंजु, उमेश तोरस्कर, गोविंद नाईक, अर्चना आंबेलकर, श्रुती वळंजु, वैदेही देसाई, महादेव आईर, गोविंद वराडकर, गुरु कल्याणकर, अभिजीत देसाई, व्यंकटेश ऊरुमकर, पंकज देसाई, राजन नाईक यांनी निवेदन दिले आहे.
बांदा गवळीटेंब वळंजू घर ते पाटकर बाग कॉर्नर रस्त्यासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
