⚡मालवण ता.०१-: मराठी भाषेला वैभवशाली असा इतिहास आहे. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. मराठीची प्रतिष्ठा वाढविणे ही शिक्षण संस्था, शासकीय संस्था, शासन आणि मराठी माणूस या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मराठी ही शासकीय पातळीवर राजभाषा असली तरी जनमाणसांमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवणारी लोकभाषा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविणारी व्यवहार उपयोगी ज्ञानभाषा झाल्यानंतरच मराठी भाषेला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ कदम यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. सोमनाथ कदम हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, मराठी विभाग प्रमुख प्रा. कैलास राबते, डॉ. अंकुश सारंग, प्रा. बी. एच चौगुले, श्री ए. डी. कदम, प्रा डॉ. देवीदास हारगिले आदी उपस्थित होते. प्रारंभी कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व सरस्वती मातेचे पूजन प्रा. सोमनाथ कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. राबते यांनी प्रास्ताविक करत मराठी भाषा दिन का साजरा केला जातो? त्यामागील हेतू काय आहे? याचे विश्लेषण करत मराठी भाषा साहित्य समाज आणि संस्कृती याचा अभिमान सर्वानी बाळगला पाहिजे असे सांगितले. प्रा. डॉ. उज्वला सामंत यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मराठी विषयाचे कार्यक्षेत्र हे विशाल व व्यापक आहे, मराठी भाषा टिकविण्याचे अनेक संतकवी, थोर समाज सुधारक व भाषा प्रेमीचे महत्वपूर्ण योगदान आहे. मराठीचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, असे सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकुर यांच्या हस्ते प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सेवा निवृत्तीच्या वाटेवर असलेले प्रा. बी. एच. चौगुले व श्री. ए.डी. कदम यांचा मराठी विभागाच्या वतीने प्राचार्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. उज्वला सामंत यांनी आभार मानले.
