बांदा मनसेने वेधले तहसीलदारांचे लक्ष
बांदा (प्रतिनिधी) :
सन २०१९ च्या महापूरातील ७० हून अधिक नुकसानग्रस्तांना अद्यापपर्यंत शासनाची भरपाई मिळालेली नाही. याबाबत मनसे बांदा विभागामार्फत सावंतवाडी तहसीलदारांची भेट घेऊन लक्ष वेधण्यात आले. बांदा विभागीय अध्यक्ष मिलींद सावंत व तालुका उपाध्यक्ष सुनील आसवेकर यांनी उर्वरित नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केली.
सन २०१९ च्या महापूरात बांदा शहरातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. सरकारने भरपाई जाहीर केल्यानंतर १५१ पैकी ७० नुकसानग्रस्तांना अद्यापपर्यंत भरपाई अदा केलेली नाही. जाचक कागदपत्रांच्या अटींमुळे तीन वर्षे उलटूनही भरपाई मिळालेली नाही.
याबाबत मनसेकडून सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यांच्याकडे मिलींद सावंत व सुनील आसवेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तातडीने भरपाई रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. मनसेतर्फे जनजागृती करुन कागदपत्रे जमा करण्यात येतील असे मनसेतर्फे सांगण्यात आले. कागदपत्रांची पूर्तता करुन लवकरच पुन्हा तहसीलदारांची भेट घेणार असे मिलींद सावंत यांनी स्पष्ट केले.
