सुभाष देसाई; बाळासाहेबांची रुजिवलेला शिवसेनेचा विचार चोरता येणार नाही…
मालवण (प्रतिनिधी)
माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हणाले होते. मात्र शिवसेनेने ज्यांना मोठे केले त्यांनीच बाळासाहेबांचे शब्द विसरून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसत आणि भाजपच्या साथीने दगाबाजी करून उद्धव ठाकरे यांचे सरकार खाली खेचले. गद्दारांनी खोटेपणाने शिवसेनेचे नाव व चिन्ह चोरले आहे, मात्र त्यांना बाळासाहेबांनी रुजविलेला शिवसेनेचा विचार चोरता येणार नाही. अशा खोकेवाल्या गद्दारांना गाडल्याशिवाय आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनविल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे बोलताना केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सुरू असलेल्या शिवगर्जना या मोहिमे अंतर्गत आज मालवण कोळंब येथील समर्थ हॉल मध्ये मेळावा संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुभाष देसाई हे बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, महिला जिल्हासंघटक सौ. जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, मंदार ओरसकर, शिल्पा खोत, सेजल परब, तृप्ती मयेकर, शिला गिरकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी सुभाष देसाई यांचा आम. नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सुभाष देसाई म्हणाले, गद्दारांनी शिवसेनेचे चिन्ह व नाव चोरले. चोरलेल्या धनुष्यबाणाचा उपयोग काय? नाव चोरा, निशाणी चोरा, जनता त्यास भीक घालत नाही. जनता ही उद्धव ठाकरेंच्याच बाजूने आहे. म्हणूनच अंधेरीच्या निवडणुकी नंतर निवडणूक घेण्याची भाजप व शिंदेची हिंमत नाही. भाजपचे लोकही निवडणुकीला घाबरत आहेत. आज उद्धव ठाकरेंना यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री तसेच ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री स्टॅलिन, नितीश कुमार आदी नेते पाठिंबा देत आहेत. जेवढं वाईट करत येईल तेवढं करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, शासकीय यंत्रणा भाजपला विकल्या गेल्या आहेत, असे आरोप सुभाष देसाई यांनी करत काही झाले तरी आम्ही शिवसैनिक डगमगणार नाही, असे सांगितले.
यावेळी अरुण दूधवडकर म्हणाले, भाजपने आंगणेवाडी यात्रा हायजॅक केली, त्यामुळे जनतेनेच भाजपला शाप दिलेत. शिवसेनेचे नाव व चिन्ह चोरले तरीही शिवसेना कोणाची असे दुश्मनाला जरी विचारले तरी शिवसेना ठाकरेंची असेच उत्तर येणार. म्हणूनच शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित राहावे, या भागात आमदार म्हणून पुन्हा वैभव नाईक हेच निवडून येतील आणि हॅट्ट्रिक साधतील, असेही दूधवडकर म्हणाले. यावेळी प्रदीप बोरकर म्हणाले, सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. संकट येते तेव्हा शिवसैनिक त्वेषाने उभा राहतो, भाजप गलिच्छ राजकारण करत आहे, जी व्यक्ती आयकर विभागात कामास होती त्याच व्यक्तीकडे आज करोडोची संपत्ती आहे, मात्र त्यांच्यावर धाड टाकली जातं नाही. भाजप आणि गद्दार शिंदे गटाला धडा शिकवलाच पाहिजे असेही बोरकर म्हणाले.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, ज्या पक्षाचे नाव नाही त्या पक्षाचे आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले, हीच आपली ताकद आहे. शेवटचा आमदार गेला तरी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असे आपण आधीच सांगितले आहे. भाजपने आमच्या कितीही चौकशा लावल्या, दबाव टाकला तरी आम्ही उद्धव ठाकरेंचेच शिवसैनिक राहणार. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या च्या पाठीशी राहिले पाहिजे, अन्याया विरोधात लढण्यासाठी ताकद उभी केली पाहिजे. आज जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, म्हणूनच भाजप निवडणुकी पासून पळत आहे, निवडणूक होईल तेव्हा जनताच भाजपाला जागा दाखवेल, असेही आमदार नाईक म्हणाले.
यावेळी भाई गोवेकर, जान्हवी सावंत, हरी खोबरेकर, मंदार केणी यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरी खोबरेकर यांनी केले.
