मालवणात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असताना जिल्हा व नगरपालिका प्रशासन झोपेत

मालवणात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असताना जिल्हा व नगरपालिका प्रशासन झोपेत

*💫मालवण दि.२१-:* मालवणात यापूर्वी कोरोना रुग्ण संख्या कमी झालेली असताना दिवाळी सुट्टी पासून मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांमुळे मालवणात कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो. मात्र केवळ स्थानिक नागरिकांवर कारवाई करणारे जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासन झोपी गेले असून मास्क न वापरणाऱ्या व सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्या पर्यटकांवर कोणतीही कारवाई करत नाही. मालवणचे नगराध्यक्षही झोपी गेले असून पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत करत प्रशासनाने या सर्व परिस्थितीवर वेळीच लक्ष न दिल्यास मालवण शहरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असून त्यास जिल्हा प्रशासन व नगरपरिषद प्रशासन जबाबदार असेल असेही आचरेकर यांनी सांगितले. मालवण येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सुदेश आचरेकर बोलत होते. यावेळी भाजचे शहरअध्यक्ष दीपक पाटकर, न.प. गटनेते गणेश कुशे, विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, जगदीश गावकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, जिल्हा प्रशासन व नप प्रशासन ठप्प आहे. सरकार निष्क्रिय असून प्रशासन निष्काळजीपणाने वागत आहे. मालवणात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. मात्र पर्यटक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नसून मास्क वापरत नाहीत. सोशल डिस्टनसिंगचे देखील तीन तेरा वाजले आहेत. यामुळे मालवणसह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. मालवणच्या प्रवेशद्वारावर तपासणी कक्ष उभारून येणाऱ्या पर्यटकांची रॅपिड टेस्ट करणे गरजेचे आहे. यासाठी पालकमंत्री, सत्ताधारी लोकप्रतिनिधी व नगराध्यक्ष यांनी प्रशासनाच्या सहकार्याने पुढाकार घेणे गरजेचे होते. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. दुसऱ्या लाटेचा नगराध्यक्षांचे विसर पडला आहे की काय ? जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले आहे. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा, कोविड तपासणी व उपचार केंद्राचा आढावा घेण्यास त्यांना वेळ नाही अशी टीका आचरेकर यांनी केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या संख्येने मालवणात दाखल होत असून मास्कचा वापर करत नाही. सर्व ठिकाणी गर्दी होत आहे. प्रशासन मात्र स्थानिक नागरिकांवर कारवाई करत आहे. याला जबाबदार कोण असा सवालही आचरेकर यांनी उपस्थित केला. मालवण शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे धोरण स्वीकारून नगराध्यक्ष दंड वसूल केल्याचे आकडे दाखवत आहेत. तर दुसरीकडे आमदार वैभव नाईक विना मास्क फिरणाऱ्या पर्यटकांवर दंड आकारू नका असे सांगत आहेत. एकाच पक्षाच्या दोन लोकप्रतिनिधीची दोन भूमिका असून जनतेच्या जीवाशी खेळले जात आहे, अशी टीका गटनेते गणेश कुशे यांनी केली. मालवण शहरात मोकाट कुत्र्यांचा व गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मॉर्निंग वॉक, नाईट वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर कुत्रे धावून येतात. नागरिक धास्तावले असून रस्त्यावरून चालणे मुश्किल बनले आहे. गुरांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. कुत्रे व गुरांमुळे अपघातही घडले आहेत. मात्र याबाबत नगरपालिकेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. नगरध्यक्षांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास आगळे वेगळे आंदोलन छेडण्यात येईल असा यावेळी इशारा सुदेश आचरेकर यांनी दिला. कोरोना काळात गेले नऊ महिने नगरपालिकेची सभा झाली नाही. केवळ दोन वेळा झालेल्या ऑनलाईन सभेत जनतेचे प्रश्न मांडता येत नाही. सर्व खुले झाले असताना १९ सदस्यांची सभा का घेतली गेली नाही, ऑफलाईन सभेस नगराध्यक्षांचा विरोध का असा सवाल आचरेकर यांनी उपस्थित केला. यापुढील सभा ऑनलाईन घेतल्यास सभेवर बहिष्कार घालू, असा इशारा गणेश कुशे यांनी यावेळी दिला.

You cannot copy content of this page