उत्पन्न वाढविण्यासाठी उद्योग, व्यवसाय हाच पर्याय

अडचणींवर मात करीत विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे;कुंभारमाठ पॉलिटेक्निक येथे केंद्रीयमंत्री राणे यांचे आवाहन

मालवण दि प्रतिनिधी
शिक्षण झाल्यानंतर काहीवेळा आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी नोकरीला प्राधान्य देतात परंतु नोकरी करताना अनेक मर्यादा येतात, उत्पनही मर्यादीत राहते. परंतु उद्योग, व्यवसाय हा तुमचे उत्पन्न वाढविणारा पर्याय आहे. त्यामुळे आलेल्या अडचणींवर मात करून चांगले उद्योजक बनण्यासाठी विध्यार्थ्यांनी वाटचाल करावी त्यासाठी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील नवउद्योजकांना अनेक संधी निर्माण करून देण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्गातील तरूणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे बोलताना केले.

मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कृतज्ञता स्नेहमेळावा २०२३ अंतर्गत माजी विद्यार्थी संघ सभासद नोंदणी अभियान शुभारंभ केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मालवण शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव ललित वंजारे, खजिनदार गणेश केळुसकर, उद्योजक दत्ता सामंत, जि प माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, उत्तम जाधव, हेमंत सावंत, अमेय बर्डे, कमलिनी प्रभु व अन्य उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नारायण राणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी उद्योगाकडे वळावे. सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला तरूण उद्योजक घडवायचे आहेत. येत्या काही काळात इंजिनियरींग व आधुनिक तंत्राज्ञावर आधारीत उद्योग जिल्ह्यात आणायचे आहेत. त्यासाठी नवउद्योजकांची साथ मला हवी आहे. उद्योगाच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर रहावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून ना राणे म्हणाले सिंधुदुर्ग हे माझे कुटुंब आहे ही भावना माझी कायम असते. येथील विद्यार्थी उच्चशिक्षित बनले पाहिजेत. उद्योजक, उद्योगपती घडले पाहिजेत. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक टेक्नॉलॉजीचे उद्योग आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्गातील तरूणांनी उद्योजक बनावे. असे आवाहन त्यांनी केले

यावेळी ना राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या गतीमान प्रगतीची घौडदौड सुरू आहे. जागतिक स्तरावर भारत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. आगामी काही वर्षात भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे पंतप्रधान यांचे धेय्य आहे. देशाच्या गतिमान अर्थव्यवस्था उभारणीत आपल्या सर्वांचे योगदानही महत्वाचे आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्राचार्य सुरेश पाटील यांनी शासकीय तंत्रनिकेतच्या कामाकाजाचा आढावा मांडला. तीन वर्षात शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांचे १०० टक्के प्रवेश झालेले आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी कॉलेज प्रशासन व माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापना व अपेक्षित भूमिका स्पष्ट केली. तंत्रनिकेनच्या दुरूस्तीसाठी ६ कोटी एवढा खर्च अपेक्षित असल्याची माहिती दिली. यापैकी काही निधी सा. बा. विभागाच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. उर्वरित निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रनिकेतन येथील सभागृह नूतनीकरण करण्यासाठी माजी विद्यार्थी संघ पुढाकार घेणार असल्याचे संतोष कदम म्हणाले. एकूणच या कृतज्ञता मेळाव्याला आजी माजी विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. शेवटी प्रा चोपडे यांनी आभार मानले

You cannot copy content of this page