⚡मालवण ता.१५-: श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन,पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा कलागौरव पुरस्कार मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांना प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथील बालगंधर्व कलादालन येथे श्री तिरुपती बालाजी यांच्या जीवन चरित्रावर आधारित रांगोळी प्रदर्शन व कला गौरव पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार चांदरकर यांना प्रदान करण्यात आला.
पुण्याचे महापौर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, टीव्ही मालिका तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेते हार्दिक जोशी (राणादा) आणि अक्षया जोशी (अंजली मॅडम) या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ रांगोळीकार जगदीश चव्हाण, श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनचे संस्थापक अक्षय शहापूरकर, संस्थापक प्रतीक अथणे, संचालक अजित पवार, श्रीरंग कलादर्पणचे सर्व कलाकार व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात शंभर कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून श्री तिरुपती बालाजी यांचे चरित्र साकारले होते. मालवण कट्टा सारख्या ग्रामीण भागातील कला शिक्षकाची रांगोळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनने कला गौरव पुरस्कारासाठी आपली निवड केली ही मोठी गोष्ट असल्याचे यावेळी समीर चांदरकर यांनी सांगत श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनचे आभार मानले.
