⚡मालवण ता.१५-: मालवण येथील मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बॅ. नाथ. पै. सेवांगण येथे मूळ सिंधुदुर्गातील असलेले प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिजित वारंग यांचा आणि त्यांचे सहकारी अभिनेता, अभिनेत्री यांचा त्यांच्या मराठी चित्रपट सृष्टीतल्या योगदानाबद्दल सत्कार करून सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी दिग्दर्शक अभिजित वारंग यांच्यासह अभिनेता प्रणव रावराणे, अभिनेत्री अश्विनी कासार, हिंदी- मराठी मालिका अभिनेत्री तारका पेडणेकर, तारकर्लीच्या अभिनेत्री नमिता गावकर आदी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गातील जनजीवन, या ठिकाणचे समुद्रकिनारे इथल्या व्यक्तिरेखा अभिजित वारंग यांनी आपल्या चित्रपटात समर्थपणे सादर करून सिंधुदुर्गातील प्रतिभावंत दिग्गज कलाकारांना त्यात महत्त्वाच्या भूमिका दिल्या. यासाठी त्यांच्यावर कौतुकाची थाप म्हणून मातृत्व आधार फाऊंडेशन तर्फे वारंग व त्यांच्या सहकारी कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील, मालवणच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतीज्ञा खोत आदी उपस्थित राहणार आहेत.
