वाफोली येथील घटनेची पोलिसांत तक्रार
बांदा/प्रतिनिधी
लघु पाटबंधारे विभागाच्या वाफोली (ता.सावंतवाडी) येथील धरणाचे पाणी संचलित करणारे मुख्य लोखंडी चाक अज्ञातने चोरून नेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात बांदा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. यामुळे धरणाची पाणी सोडण्याची यंत्रणा बंद पडल्याने वाफोली गावात गेले ४ दिवस पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.
गुरुवारी सकाळी हंगामी चौकीदार बापू भानू गवस हे पाणी सोडण्यासाठी धरणावर गेले असता धरणाचे मुख्य विमोचक द्वार परिचलन करण्याचे लोखंडी चाक निदर्शनात आले नाही. याबाबत त्यांनी तात्काळ याची कल्पना लघु पाटबंधारे कार्यालयाच्या क्षेत्रिय कर्मचारी व अधिकारी यांना दिली. कनिष्ठ अभियंता आर. एस. जोशी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एस. एस. परब यांनी याठिकाणी धाव घेत पाहणी केली. चौकीदार श्री गवस यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी लोखंडी चाक होते मात्र रात्री काळोखाचा फायदा घेत ही चोरी झाल्याची शक्यता आहे.
यावेळी वाफोली पोलीस पाटील आना गवस, सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच वीनेश गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, चौकीदार बापू गवस, पाणी वापर समिती अध्यक्ष सौ. धनश्री गवस, शिवाजी गवस, अनिल गवस, मंथन गवस, शैलेश गवस, उमेश गवस, तसेच स्थानिक शेतकरीही उपस्थित होते.
यावेळी बांदा पोलीस ठाण्यात पत्र देण्यात आले.
