तळाशील समुद्रकिनाऱ्यावर मालवण पोलिसांची कारवाई
मालवण दि प्रतिनिधी
तळाशील समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी रात्री वाळू मध्ये पूरून ठेवलेला अठरा किलो सहाशे ग्राम वजनाचे २७ लहान मोठ्या आकाराचे व्हेल मासा उलटी सदृश्य पदार्थाचे तुकडे मालवण पोलिसांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण तालुक्यातील तळाशील समुद्र किनारी एका व्यक्तीने एक पदार्थ वाळू मध्ये पुरून ठेवल्याची माहिती मालवण पोलिसांना मिळताच मालवणचे पोलीस हेड कॉन्स्टेबल एच. व्ही. पेडणेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशांत पवार या दोघाजनांच्या पथकाने मालवणचे पोलीस निरीक्षक श्री. विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तळाशील समुद्र किनारी गुरुवारी रात्री धाव घेतली. त्यांनी त्या परिसरात चौकशी केल्यानंतर त्यांना तळाशील समुद्र किनारी वाळू मध्ये पुरून ठेवलेला एक पदार्थ आढळून आला हा पदार्थ व्हेल मासा उलटी सदृश्य पदार्थाचे तुकडे असू शकतात अशी माहिती पोलिसांना उपलब्ध झाल्यानंतर पोलिसांनी वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २७ लहान मोठ्या आकाराचे १८ किलो ६०० ग्राम वाजनाचे व्हेल मासा उलटी सदृश्य पदार्थाचे तुकडे जप्त केले आहेत.
