राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची प्रक्रिया थांबविण्यात यावी…

▪️शिक्षक भारतीची मागणी

*💫मालवण दि.१३-:* परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना धारक शिक्षकांच्या अंशदान कपातीच्या वार्षिक हिशेब तक्त्यात तफावती आहेत. या तफावती दूर करून त्यात नियमितता व अचूकता येत नाही तोपर्यंत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची प्रक्रिया राबविण्यात येऊ नये अशी मागणी करतानाच या योजने बाबत शिक्षकांना कोणतीही माहिती नसल्याने सदर प्रक्रिया राबविणे अन्यायकारक आहे असे म्हणणे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती मालवण शाखेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मांडण्यात आले. याबाबतचे निवेदन शिक्षक भारती मालवण शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना सादर केले. यावेळी मालवण शाखा अध्यक्ष संतोष कोचरेकर, सरचिटणीस संतोष परब, उपाध्यक्ष धानजी चव्हाण, कोषाध्यक्ष विनेश जाधव, प्रमोद पाटील, महादेव घोडके, भागवत अवचार, भाग्यवंत बेहरे, विठ्ठल शिंदे, लीना भंडलकर, कल्पना भरसट, महेश कदम, शंकर गोसावी, नागेश जाधव, दीपक ठाकरे, विकास कपाटे, संजय जाधव आदी व इतर उपस्थित होते. मालवण तालुक्यातील DCPS (परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना) धारक शिक्षकांनी CSRF फॉर्म भरून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अर्थात NPS योजना स्वीकारावी असे कळविण्यात आलेले आहे. परंतु मालवण तालुक्यातील अनेक DCPS धारक शिक्षकांच्या अंशदान कपातीच्या वार्षिक हिशेब तक्त्यात तफावती आहेत. काही शिक्षकांच्या वेतनातून DCPS रक्कम कपात होऊन देखील अंशदान योजनेच्या खाती जमा नाही. त्याशिवाय सर्व DCPS धारकांना सर्व वर्षांचे हिशेबत्ते प्राप्त झालेले नाहीत. अंशदान योजनेतील वरील त्रुटीबाबत संघटनेने लेखी निवेदने देवून तथा प्रत्यक्ष भेट घेवून कार्यालयाचे लक्ष वेधलेले होते. मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अंशदान हिशेब तक्त्यातील तफावती दूर करून त्यात नियमितता व अचूकता येत नाही तोपर्यंत NPS योजनेची प्रक्रिया राबविण्यास संघटनेचा आक्षेप आहे, असे निवेदनात म्हटले आहे. NPS योजनेबाबत शिक्षकांना कोणतीही माहिती नसल्याने सदर प्रक्रिया राबविणे अन्यायकारक आहे. तरी NPS योजनेसंदर्भातील मराठी भाषेतील अधिकृत माहितीपुस्तिका सर्व DCPS धारक शिक्षकांना पुरविण्यात यावी. सर्व मुद्द्यांची प्रतिपूर्ती होईपर्यंत CSRF फॉर्म भरण्याची सक्ती करण्यात येवू नये, किंबहुना फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

You cannot copy content of this page