१४ हजाराच्या दारुसह ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी
गोवा बनावटीच्या दारूची दुचाकीने अवैद्य वाहतूक करताना आंबोली पोलिस तपासणी नाक्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. रामचंद्र विलास तोडकर (२९), रा. निपाणी व अमोल श्रीमंत जाधव रा. बेळगाव, अशी दोघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १४ हजाराची दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली ४० हजार रुपयाची दुचाकी मिळून एकूण ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची अधिक माहिती अशी की, दोघेही संशयित आपल्या दुचाकीने सावंतवाडीहुन आंबोलीच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांच्या हातात असलेल्या संशयास्पद बॅग वरून त्यांना चेक पोस्टवर थांबविण्यात आले. यावेळी बॅगची तपासणी केली असता त्यात १४ हजार किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करत वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली. तसेच अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस दत्ता देसाई, दीपक शिंदे व राजेश नाईक यांच्या पथकाने केली.
