माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
मालवण (प्रतिनिधी)
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रेस उपस्थित राहून दर्शन घेणारे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत येणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराज देसाई आदी व इतर मंत्र्याचे जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे जंगी स्वागत करण्यात येणार असून श्री भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी आंगणेवाडी येथील कार्यालयात संवाद साधणार आहेत या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना आंगणेवाडीच्या तसेच जिल्ह्यातील विकासात्मक प्रश्नांबाबत लक्ष वेधले जाणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मालवण चिवला बीच येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हा संघटक नीलम शिंदे, तालुकाप्रमुख महेश राणे, विश्वास गावकर, राजा गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, मालवण महिला तालुकाप्रमुख सोनाली पाटकर, कविता मोंडकर, हर्षद पारकर, कामलाकांत पारकर, अरुण तोडणकर, राजा तोंडवळकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी सुधीर सावंत म्हणाले, मुख्यमंत्री आंगणेवाडी यात्रेस सकाळच्या सत्रात उपस्थित राहणार असून हेलिकॉप्टरद्वारे त्यांचे आगमन होणार आहे. याबाबत आंगणेवाडी येथे भेट देऊन आढावा घेण्यात आला तसेच आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ मंडळाशी चर्चा करण्यात आली. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांचीही भेट घेण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या आंगणेवाडी भेटीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल असेही ते म्हणाले.
सुधीर सावंत पुढे म्हणाले, यापूर्वी मी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना आंगणेवाडी यात्रेस घेऊन आलो होतो. त्यावेळी शासकीय कायद्यात बदल करून आंगणेवाडी या धार्मिक क्षेत्रास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला होता, त्यामुळे आंगणेवाडीला निधी मंजूर होऊन आंगणेवाडीत नळपाणी योजना झाली. मात्र आजही आंगणेवाडीचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यामुळेच आंगणेवाडी हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यास कोणत्या सुविधा आवश्यक आहेत त्याबाबत चर्चा करण्यात आली असून त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जाणार आहे, त्यानुसार मुख्यमंत्री यात्रेदरम्यान आपली भूमिका व उपाययोजना जाहीर करतील, असेही सावंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या आंगणेवाडी भेटीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासाबाबत तसेच रखडलेले प्रकल्प याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक कसे येतील, पर्यटनातून येथील जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध कसा होईल, देवबाग येथील त्सुनामी आयलंड वाचविण्यासाठी काय करता येईल तसेच किनारपट्टीचे धूप होण्यापासून संरक्षण करणे आदी विविध विषयांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री याबाबत नक्कीच ठोस निर्णय घेऊन आपली भूमिका जाहीर करतील तसेच मुख्यमंत्र्यांची ही भेट जिल्ह्यासाठी लाभदायी ठरेल, असा विश्वासही सुधीर सावंत यांनी व्यक्त केला.
