⚡मालवण ता.३०-: कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आज मालवण तालुक्यात २०४ मतदारां पैकी २०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मालवण तालुक्यात ९२.६५ टक्के एवढे मतदान झाले.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकी करता आज मतदान झाले. या निवडणुकीत शिंदे गट भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे व महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. आज सकाळी या निवडणुकीच्या मतदानाला प्रारंभ झाला. मालवण तालुक्यात एकूण २०४ मतदार असून त्यामधील २०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात १३१ पुरुष मतदारांनी तर ६४ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी चार मतदार केंद्रे ठेवण्यात आली होती. मालवण तहसीलदार कार्यालयातील केंद्रावर एकूण शंभर मतदारांची नोंदणी होती त्यापैकी ९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ६७ पुरुष मतदार तर ३२ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर कट्टा मतदान केंद्रावर ५२ पैकी ५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात ३६ पुरुष मतदार तर १५ स्त्री मतदार यांचा समावेश आहे. मसुरे आणि आचरे मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले. मसुरे येथे दहा पुरुष मतदारांनी तर चार स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर आचरेमध्ये पुरुष २५ मतदारांनी आणि १३ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मालवण तालुक्यात अत्यंत शांततेत मतदान पार पडले निवडणुकीनंतर तालुक्यातील शिक्षक मतदार मतदान केंद्राबाहेर कोण निवडून येणार याबाबत गटागटाने चर्चा करतानाच चित्र होते.
