मंदार केणी यांचे आवाहन;धामापूर नळ योजना निविदावरून आरोप – प्रत्यारोप सुरूच
मालवण दि प्रतिनिधी
माजी खासदार निलेश राणे यांच्या आदेशानेच भाजपच्या चार नगरसेवकांनी धामापूर नळपाणी योजनेच्या ठरावाला विरोध केला होता. परंतु नळपाणी योजना शहरासाठी लवकरात लवकर व्हावी यासाठी आमदार वैभव नाईक हे प्रयत्नशील राहिले. सध्या धामापूर नळपाणी योजनेची पुनर्निविदा प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच या नळपाणी योजनेचे काम अद्यापही कोणाला मिळालेले नसताना या नळपाणी योजनेचे निविदा मॅनेज कशी झाली हे निलेश राणे यांनी सिद्ध करून दाखवावे असे आव्हान मालवणचे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले.
मालवण येथील शिवसेना शाखा कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी बाबी जोगी, नरेश हुले यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना श्री. केणी म्हणाले, धामापूर नळपाणी योजना शहरासाठीची महत्त्वपूर्ण नळपाणी योजना आहे. चार ते पाच वर्षे या नळपाणी योजनेचे काम रखडले होते. आमदार वैभव नाईक यांनी या नळपाणी योजनेसाठी प्रयत्न केले. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे असताना चार वेळा निविदा प्रक्रिया झाली. परंतु या निविदेसाठी कोणीही आले नाही. त्यामुळे ही योजना रखडली. त्यानंतर योजनेतील त्रुटी दूर करून योजना नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. ही योजना नगरपालिकेत मंजुरीसाठी आली असताना भाजपच्या चार नगरसेवकांनी योजनेच्या ठरावाला विरोध केला. या ठरावाला विरोध करण्याचे आदेश राणेंकडूनच आले होते. त्यानंतर योजनेसाठी ५३ कोटीचा डीपीआर बनवण्यात आला. ठरावानंतर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे गेली. त्यावेळी त्यामध्ये त्रुटी काढण्यात आल्या. त्यानंतर ही योजना ४० कोटी रुपयांची झाली. परंतु पाईपचे दर बदलल्याने सद्यस्थितीत ही योजना ४३ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे निलेश राणेंनी या योजनेबाबतची माहिती घ्यावी. सद्यस्थितीत धामापूर नळपाणी योजनेमधून जुन्या पाईपलाईन मधून पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत धोकादायक बाब आहे. अशा स्थितीत धामापूर नळपाणी योजना लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून धामापूर नळपाणी योजनेला गती मिळत आहे. सध्या नळपाणी योजना पुनर्निविदा प्रक्रियेमध्ये आहे. परंतु निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या ऐकीव माहितीवरूनच आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांनी धामापूर नळपाणी योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी आणि टीका करण्यापेक्षा भरीव काम करून दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले.
आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात मालवण शहर व तालुक्यात भरीव अशी कामे होत आहेत. परंतु निलेश राणे हे केवळ टीका करण्याचे काम करत आहेत. तळाशील येथील दहा कोटी रुपयांचा बंधारा दहा दिवसात मंजूर करून आणतो असे राणेंनी सांगितले होते त्याचे काय झाले? आता त्यांची सत्ता असतानाही देवबाग बंधाऱ्यासाठी सीआरझेड मंजुरीची परवानगी त्यांना का आणता आली नाही. व्यायाम शाळेबाबत राणेंनी जे आरोप केले होते त्या आरोपातही कोणतेही तथ्य नव्हते. त्यामुळे राणेंनी टीका करण्यापेक्षा जनतेसाठी भरीव काम करावे असा टोलाही केणी यांनी यावेळी लगावला.
