अनेक मंत्रीही दर्शनासाठी राहणार उपस्थित;शिंदे गटाचे कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांची माहिती
मालवण दि प्रतिनिधी :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक यात्रोत्सवाला
राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून श्री भराडीचे दर्शन घेणार असून मुख्यमंत्र्यासमवेत शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्रीही यात्रेला उपस्थित राहणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथे आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी पक्ष कार्यलयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, कुडाळ मालवण महिला आघाडी प्रमुख नीलम शिंदे, मालवण शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख पराग खोत, ऋत्विक सामंत, महिला आघाडी मालवण उपतालुकाप्रमुख भारती घारकर आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना बबन शिंदे म्हणाले, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली आंगणेवाडी यात्रा शनिवार दि. ४ फेब्रुवारीला होत आहे. श्री भराडी देवीच्या कृपाशीर्वादाने एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. त्यांची देवी भराडीवर अपार श्रद्धा असून आंगणेवाडी जत्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची त्यांच्याशी चर्चा झाली आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तसेच जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आंगणेवाडीसह जिल्ह्यात जंगी स्वागत केले जाणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
बबन शिंदे पुढे म्हणाले, मालवण तालुक्यातील रस्ते, पूल आदी व इतर काही कामे तांत्रिक बाबींमुळे रखडली होती. काही कामांना स्थगिती होती. तीही उठली आहे. याबाबत मंत्री सामंत व केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे रखडलेल्या कामांना गती मिळेल असेही ते म्हणाले.
स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम
स्व. बाळासाहेब ठाकरे यांची सोमवारी जयंती साजरी होत असून राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने उद्या २३ रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे पाककला स्पर्धा आयोजित केली असून स्पर्धकांनी गोड पदार्थ सादर करावयाचे आहेत. यातील प्रथम दोन विजेत्यांना अनुक्रमे २१००रु. व ११०० रु. पारितोषिक देण्यात येणार आहे. तर आचरा येथे १ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर होणार आहे. तसेच २७ जानेवारी रोजी कोळंब येथील समर्थ हॉल मध्ये हळदकुंकू समारंभ व सत्कार सोहळा होणार आहे, अशी माहिती बबन शिंदे व नीलम शिंदे यांनी यावेळी दिली.
