⚡देवगड ता.०७-: एखादी कला अशी जोपासावी की ते आपले करिअर बनावे. जीवनामध्ये संतु ।ष्टता , कृतज्ञता व संयमता याला महत्त्व द्यावे. संगणकाचा सदुपयोग करा. चांगले आचार विचार ठेवा. सुसंस्कारीत होण्यासाठी सदगुणाचा स्विकार करा. संस्कारक्षम गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कसे वागावे याविषयी उदाहरणासह माहिती दिली.एखादया गोष्टीच्या निर्मिती मध्ये अनेकांचे हात असतात , असे उदगार कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.उल्का जोशी यांनी काढले. शेठ म. ग.हायस्कूल , देवगड येथे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या पारितोषिक वितरण सोहळा या प्रसंगी त्या आपल्या भाषणात बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील निवडक विद्यार्थी त्यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या सौ.उल्का जोशी व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. चंद्रकांत शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक संजीव राऊत , पर्यवेक्षक सुनिल घस्ती , या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापक, संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी चंद्रकांत शिंगाडे , प्रमुख पाहुण्या सौ.उल्का जोशी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुनिल घस्ती यांनी केले. प्रशालेत राबवत असलेले विविध उपक्रम , सहशालेय उपक्रम , शालेय व शाला बाह्य स्पर्धा याचा घोषवारा आपल्या प्रास्ताविकात मांडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली . वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धा तसेच शालांतर्गत व शाला बाह्य स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. ४३ वेळा रक्तदान केलेल्या शिक्षकेत्तर कर्मचारी श्री पंढरीनाथ आचरेकर ,राष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रकल्पाचा सहभाग मिळवणारा माजी विद्यार्थी राहुल प्रदिप सारंग , राष्ट्रीय स्तरावर प्रकल्पाची निवड झालेले तनिष्क बिडये इयत्ता १० वी, सर्वेश परुळेकर इयत्ता ९ वी , सोनी टि व्ही मराठी या वाहिणीवरील “छोट्या बयोची मोठी स्वप्न ” या मालिकेच्या माध्यमातून घरोघरी पोहचले असे आपल्या प्रशालेचे विद्यार्थी शौरीन देसाई , अनुष्का पोकळे ,चिन्मया ठाकूर या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला .पारितोषिकांचे वाचन प्रवीण खडपकर यांनी केले.
जीवंत दैवत आपले आई-वडील आहे. त्यामुळे आपण त्यांना वंदन करावे. जो विनम्र असतो , तोच यशस्वी होतो. समाजामुळेच आपल्याला भावनिक विकास व उच्च स्थान प्राप्त करता येते. त्यासोबत शिक्षणाने माणूस म्हणून समाजात जीवन जगण्यास लायक ठरतो. जगा व जगू दया ! असा संदेश चंद्रकांत शिंगाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला.
प्रशालेचे मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी शाळेमध्ये सुरु असलेल्या अनेकविध सहशालेय उपक्रमाची माहिती देवून स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निशा दहीबावकर यांनी केले तर आभार आरती लोके यांनी मानले.
सुसंस्कारीत होण्यासाठी सदगुणाचा स्विकार करा – सौ. उल्का जोशी
