चौकुळ येथील आई व मुलगा जखमी;एलसीबी कर्मचाऱ्यांचे सहकार्य
⚡कणकवली ता.२७-:
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजिक वागदे डंगळवाडी येथे मांजर आडवे आल्याने मोटरसायकल घसरून वृद्धेसह चालक जखमी झाला. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील शुभांगी आत्माराम गावडे (वय 68 ) सत्यवान आत्माराम गावडे (वय 39 ) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात आज सकाळी 11 वाजता घडला.
चौकुळ येथील गावडे माता पुत्र ओरोस येथे कामानिमित्त मोटरसायकलने जात होते. ओरोस येथे उड्डाणपुलावर लक्षात न आल्यामुळे ते ओरोस ऐवजी पुढे कणकवलीपर्यंत आले. चौकशी केली असता त्यांना ओरोस मागे राहिल्याचे लक्षात आल्यानंतर मोटरसायकलचालक सत्यवान आपल्या आईसह मोटरसायकलने पुन्हा ओरोसच्या दिशेने जात होता. दरम्यान वागदे येथे रस्त्यावर मांजर आडवे आल्यामुळे सत्यवान याचे नियंत्रण सुटून मोटरसायकल रस्त्यावर आदळली. त्यात सत्यवानसह मागे बसलेली त्याची आई शुभांगी जखमी झाली.
हा अपघात घडत असतानाच ओरोसहुन कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकातील हवालदार राजू जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे, चालक रवी इंगळे यांनी तात्काळ आपल्या शासकीय वाहनातून शुभांगी आणि सत्यवान यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ चौगुले यांनी दोन्ही जखमींवर प्राथमिक उपचार केले. या अपघातात जखमी शुभांगी यांच्या डोकीला मार लागला असल्याचे समजते. तर सत्यवान गावडे यांचा उजवा हात दुखापतग्रस्त झाला आहे. एलसीबीच्या कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे दोन्ही जखमींवर तात्काळ उपचार शक्य झाले.
