आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा यात्रेकरू भाविकांसाठी रद्द !

*💫मालवण दि.०८-:* आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा ही आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादित राहणार असल्याचे दीड महिन्यांपूर्वी आंगणे कुटूंबियांनी जाहीर केल्यानंतर आज मुंबई येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आंगणे कुटुंबीय आणि प्रशासन यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत यावर्षीची आंगणेवाडीची यात्रा ही यात्रेकरू भाविकांसाठी रद्द करण्यात आली असून ज्याठिकाणी भाविक राहत आहेत त्याठिकाणावरूनच भाविकांनी साकडे घालावे या यात्रेला भाविकांनी न येण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा कोरोना मुळे होणार की नाही याविषयी साशंकता असताना डिसेंबर महिन्यात आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि आंगणे कुटुंबीय यांनी आंगणेवाडी च्या भराडी देवीच्या यात्रेची ६ मार्च ही तारीख जाहीर करतानाच कोरोनामुळे ही यात्रा आंगणे कुटुंबियांपुरतीच मर्यादित राहणार असल्याचे जाहीर केले होते. एकंदरीत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज मुंबई येथे मंत्रालयात तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संयुक्त बैठक पार पडली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, सतीश आंगणे, आनंद आंगणे, नारायण भगवान आंगणे, नारायण विष्णू आंगणे, अर्जुन आंगणे, संजय आंगणे आदी तसेच मुंबई मंडळाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यात आली. त्यालाही आंगणे कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासन उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भराडी देवीची यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती देऊन या यात्रेला भाविकांनी न येण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी च्या धर्तीवर माझी जत्रा माझी जबाबदारी असे अभियान जत्रेत राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भराडी देवी यात्रा भाविकांसाठी रद्द केली असली तरी धार्मिक कार्यक्रम दोन दिवस सुरू राहणार आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page