Headlines

गाव कारभारी कोण ? उद्या दुपार पर्यंत होणार स्पष्ट

४९ ग्राम पंचायत मतदानाचा निकाल उद्या

⚡सावंतवाडी ता.१९-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा तोंडावर आणि राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर प्रथम ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकां जाहीर झाल्या त्यातील ३ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या असून ४९ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. उद्या मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार असून दहा टेबलावर मतमोजणी होवून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

सावंतवाडी तालुक्यातील एकूण ५२ ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली होती. त्यात तीन बिनविरोध ग्रामपंचायत तर बिनविरोध सरपंच ७ ठरले. याशिवाय ११२ सदस्य बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे दि.१८ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष ३०६ जागांसाठी मतदान (सरपंच वगळून) झाले. त्यासाठी ६४९ उमेदवार रिंगणात होते. तर सरपंच पदासाठी १२५ उमेदवार रिंगणात राहिले होते.
सरपंच पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणा-या ग्रामपंचायतीं ४५ तर प्रत्यक्ष निवडणूक होणा-या ग्रामपंचायतींची ४९ आहेत.
या निवडणुकीमध्ये ६४ हजार ३२५ मतदार होते त्यातील ४७ हजार ८९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये स्त्रिया २२ हजार ७५१ तर पुरुष २५ हजार १४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ती टक्केवारी ७४.४५ टक्के आहे.
तालुक्यातील माजगाव, बांदा,नेमळे,कारिवडे या सदस्य संख्या जास्त असणाऱ्या ग्रामपंचायती आहेत. तसेच या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत. वेत्ये,न्हावेली,निरवडे,मडुरा, केसरी फणसवडे, विलवडे,भालावल, आंबेगाव,कलबिंस्त, कास, आदी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार किंवा कसे हे चित्र स्पष्ट होणार आहे. लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदांसाठी निवडणुका होणार आहेत त्यामुळे ते चित्रही या पार्श्वभूमीवर उघड होईल.
राज्यात शिवसेना पक्षात उभी फूट पडून सत्तांतर झाले त्यामुळे या सत्तांतरानंतर उध्दव ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट झाले त्याचा भाजपाला किती फायदा होतो हेही समोर येणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट प्रवक्ते शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी युती करून निवडणूक लढविली असलीतरी काही ठिकाणी त्यांचे समर्थक निवडणुकीत आमनेसामने होते.
या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, मनोज नाईक, ठाकरे शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनीही निवडणुकीत होमपीचवर राहुन रस्सीखेच केली त्यामुळे कोणत्या गावात प्रतिष्ठा सांभाळली गेली हेही स्पष्ट होणार आहे.
भाजप, बाळासाहेबांची शिवसेना यांनी युती तर ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी करून निवडणूक लढविली होती. त्यामुळे कोणाला जास्त जागा मिळतील याकडे लक्ष वेधले आहे. भाजपाने नियोजन करून लढत दिली आहे.

You cannot copy content of this page