Headlines

मद्यपी वाहन चालकांवर महामार्ग पोलिसांची धडक कारवाई!

तीन ट्रक चालकांकडून ३० हजारांचा दंड!

कणकवली : मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात महामार्ग वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, तीन ट्रक चालकांकडून न्यायालयामार्फत प्रत्येकी १० हजार रुपये, असा एकूण ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मद्यपी चालकांवरील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्र कसालचे पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी दिली.

राज्यात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यामुळे गंभीर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी मद्यपी चालकांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महामार्ग पोलीस अंमलदार एएसआय गवस, हेड कॉन्स्टेबल बिर्जे, एकनाथ सरमळकर, पोलीस नाईक नितीन शेट्ये, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण परब, रवि इंगळे आणि पांडुरंग खडपकर यांनी वैभववाडी–तळेरे राज्य महामार्गावर विशेष तपासणी मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत असलेल्या तीन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. संबंधित तिन्ही चालकांनी कणकवली न्यायालयात प्रत्येकी १० हजार रुपये, असा एकूण ३० हजार रुपयांचा दंड भरला. यापूर्वीही मागील महिन्यात चार मद्यपी वाहन चालकांवर अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ४० हजार रुपयांचा दंड वसूल झाला होता. अशाप्रकारे गेल्या दोन कारवायांमध्ये मद्यपी वाहन चालकांकडून एकूण ७० हजार रुपयांचा दंड न्यायालयात भरविण्यात आला आहे.

यापुढेही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. सर्व वाहनचालकांनी मद्यसेवन करून वाहन चालविणे टाळावे आणि स्वतःसह इतरांच्या जीविताची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page