न. पं. च्या विरोधी गटाचे नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांचा आरोप
⚡कणकवली ता.१४-: रवींद्रनाथ मुसळे अपघाती मृत्यूप्रकरण लपविण्याचे काम कणकवली नगरपंचायत सत्ताधारी करीत असून या प्रकरणात ठेकेदाराला वाचविण्याचे प्रयत्न त्याच्याकडून केले जात आहेत.मुसळे यांचा अपघाती मृत्यू हा नगरपंचायत प्रशासन व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. या अपघातप्रकरणी नगराध्यक्ष समीर नलावडे व सत्ताधारी बोलत का नाही ? असा सवाल न. पं. च्या विरोधी गटाचे नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी केला. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी दाखवले. रवींद्रनाथ मुसळे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत न. पं. च्या विरोधी गटाचे नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजीत जाधव, सचिन सावंत, महेश कोदे, वंचितचे रोहन कदम उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायतीमार्फत ड्रेनेजची पाईपलाईन टाकण्यासाठी येथील कणकवली कनेडी मार्गावर खोदलेल्या जवळपास दहा बारा फुट खोल व सहा सात फुट रुंद चरामध्ये पडून रवींद्रनाथ मुसळे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला नगरपंचायत प्रशासन व ठेकेदाराचा बेजाबाबदारपणामुळे झाला. याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे व सत्ताधारी गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी केला.
कणकवली कनेडी मार्गावर खोदलेचे काम करताना वाहतुकीच्यादृष्टीने सर्व उपाययोजना करणे आवश्यक होते. काम पूर्ण होईपर्यंत सदर रस्ता बंद करून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. त्याठिकाणी वाहतूक पोलीस तैनात ठेवणे गरजेचे होते. बॅरिकेटस् व सूचना फलक लावून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुरू असलेल्या कामाची कल्पना देणे गरजेचे होते मात्र, सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीही उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती, असे त्यांनी सांगितले.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलींच्या अखत्यारित येत असून खोदाईचे काम सुरू करेतवेळी नगरपंचायत प्रशासनाने संबंधित विभागाला कल्पना दिली नाही. नगरपंचायत
प्रशासन व ठेकेदार यांनी रस्ता खोदाई करताना नियमांची पालमल्ली केल्यानेच रवींद्रनाथ मुसळे यांना अंदाज न आल्याने अपघात घेऊन १२ फूट खोल गटारात पडून ते गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूची जबाबदारी कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकेदाराने घेतलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
अपघात प्रकरणाची चौकशी होण्याकरिता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अपघात प्रकरणी नगराध्यक्ष व सत्ताधारी गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी करत सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता अपघात घडला त्याठिकाणी कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना केलेली दिसून येत नाही आहे. त्यामुळे रवींद्रनाथ मुसळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना नगरपंचायतीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
