अर्चना घारे-परब राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी आदर्शवत

सरपंच ते राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्ष : महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न

⚡सावंतवाडी ता.०१ प्रसन्न गोंदावळे-: सौ अर्चना घारे -परब यांचा मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ ग्रामपंचायत सरपंच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा असा थक्क करणारा प्रवास आहेच. परंतु, राजकारणात येवू पाहणाऱ्या महिलांसाठी आदर्शवत असा आहे. अशा या व्यक्तीमत्वाचा आज वाढदिवस ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा घेतलेला धावता आढावा..

सौ. अर्चनाताई घारे-परब कोकणवासियांसह जनसामान्यांसाठी झटणारी ‘कोकण कन्या’ आहे. समाजकारण, राजकारण, सहकार, उद्योग व व्यवसाय, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग यश मिळविणार हे व्यक्तिमत्त्व. विद्येच माहेरघर असणाऱ्या पुण्यात कोकणची हुशारी सिद्ध करून दाखविणारे व्यक्तिमत्व आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राष्ट्रवादी ‘युवती काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदापर्यंत भरारी घेणाऱ्या अर्चनाताई या पेशाने सिव्हील इंजिनिअर आहेत. ज्या महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी झटत आहेत. त्यांच मूळ हे आपल्या तळकोकणातील आहे. त्यामुळे चिकाटी अन् ध्यास त्यांच्या रक्तात आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात असणार भालावल हे त्यांच मूळ गाव‌. चार भावंडांत त्या ज्येष्ठ, त्यांचे वडील कै. यशवंतराव व्यावसायिक, तर आई प्रिया या गृहिणीची जबाबदारी पार पाडून व्यवसायात मदत करीत. महिला सक्षमीकरणाचं बाळकडू हे त्यांना त्यांच्या आईनंच पाजल. सावंतवाडी शहरात त्यांचा स्टेशनरी, जनरल, कॉस्मेटिक वस्तूंचा होलसेलचा व्यवसाय होता. गावात काजू, सुपारी आणि फणसाची शेतीही होती. सर्वसामान्य कुटुंबात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. यशाची शिखर पादाक्रांत केल्यानंतर आजही तो साधेपणा त्यांनी जपला आहे. सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कुलमधून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी घेतलं. नेहमी वेगळ काही तरी करावं हा विचार त्यांच्या मनात असायचा. म्हणूनच सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनात सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. पुण्यात सीओईपीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संदीप घारे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
नवनिर्मित करणे हा ध्यास असल्यानं ‘अर्चना क्रिएशन’च्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण गृहप्रकल्पाची निर्मिती करण्याचे काम त्यांनी सुरू केले. कोकणात देखील अर्चना क्रिएशनच्या माध्यमातून त्यांनी याची मुहुर्तमेढ रोवली.
२००८ मध्ये बेबड ओहळ ग्रृप ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. कुटुंबातील तसेच जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे निवडणुक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या शिक्षणाचा, स्थापत्यशास्त्राचा गावाला समाजाला फायदा होईल, नव काही शिकता येईल म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. कोणताही अनुभव नसताना निवडणूक लढवली आणि सर्वाधिक मतांनी त्या निवडूनही आल्या. चार वर्षे त्यांनी सरपंच पदाचा कारभार पाहिला. गावच्या विकासासाठी त्यांनी या काळात हातभार लावला. त्यांच्या कार्यकाळात गावाला पर्यावरण समृद्ध ग्राम, निर्मलग्राम, तंटामुक्त गाव असे पुरस्कार मिळविण्यात यश आले. त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत पंचायत राज अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकनियुक्त महिला प्रतिनिधी संघाच्या राज्य कार्यकारिणीवर त्यांची निवड करण्यात आली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी दिली. सहकारात देखील सर्वाधिक मतांनी ताई निवडून आल्या. महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री तथा विरोध पक्षनेते अजितदादा पवार यांनी पीडीसीसी बँकेच्या वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली. पहिल्यांदा एखाद्या युवतीला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी यामुळे मिळाली. ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करून त्यांना बँकेच्या माध्यमातून व्यवसायनिर्मितीसाठी मदत केली.

शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताईंच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्चनाताईंवर पक्षानं २०१८ ला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. यावेळी जिल्ह्यात नंबर एकचा असणारा पक्ष संपुष्टात आला होता. मंत्री, आमदार अशी पद ज्या राष्ट्रवादीनं या मातीत भुषविली तिथं राष्ट्रवादी औषधाला देखील शिल्लक नव्हती. हाताच्या बोटावर मोजता येतील न येतील एवढे कार्यकर्ते अन् संघटना जिल्ह्यात नावापूरती शिल्लक राहिली होती. अशा परिस्थितीत कोकणकन्या अर्चना घारेंवर पक्षानं विश्वास टाकला अन् संपलेल्या पक्षाला पुन्हा उभारी मिळाली. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामास सुरुवात केली. फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले. राष्ट्रवादी पुन्हा” असा नारा देत संपलेल्या राष्ट्रवादीला उभारी दिली. याचीच दखल घेत राष्ट्रवादीच्या पक्षनिरीक्षक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. सुप्रीयाताईंच्या संकल्पनेतून श्री यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महिलांसाठी कौटुंबिक समस्यांबाबत प्राथमिक समुपदेशन, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र सावंतवाडीत सुरू केलं. याच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून त्या कार्यरत आहेत. तर कोकण विभाग महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आली असून सिंधुदुर्गसह कोकण विभागात त्या राष्ट्रवादीचे विचार त्या पोहचवत आहेत.

You cannot copy content of this page