पाडलोसमध्ये कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

वनविभागाने दखल न घेतल्यास आंदोलन : शाखाप्रमुख महेश कुबल यांचा इशारा

⚡बांदा ता.२८-: पाडलोस-केणीवाडा येथे भरवस्तीत बिबट्याने घुसून घराची राखण करणाऱ्या कुत्र्याचा फडशा पाडला. अजित कोरगावकर यांना कुत्र्याची धडपड ऐकू आल्याने बाहेर येईपर्यंत बिबट्याने कुत्र्याच्या नरड्याचा चावा घेतला. सदर घटना आज पहाटे घडल्याचे श्री. कोरगावकर यांनी सांगितले.

शेतकरी अजित कोरगावकर यांच्या घराशेजारील मांगरामध्ये कुत्रा घराची राखण करत होता. त्यावेळी बिबट्या येत असल्याचा सुगावाही कुत्र्याला लागला नाही. जीव वाचवण्यासाठी कुत्र्याची धडपड कोरगावकर यांच्या कानी पडताच त्यांनी धाव घेतली. परंतु तोपर्यंत बिबट्याने कुत्र्याला जखमी केले होते. बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली आणि त्याला जबड्यात पकडून नेत होता परंतु श्री. कोरगावकर यांनी लाईट सुरू केल्याने बिबट्याने धूम ठोकल्याचे श्री. कोरगावकर यांनी सांगितले.

मडुरा पंचक्रोशीत बिबट्यांचा वावर वाढला असून, शेतकर्‍यांच्या पाळीव प्राण्यांना भक्ष्य केले जात आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीवप्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या आहेत. याकडे वनविभागाने गांभीर्याने पाहून तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असा इशारा पाडलोस शिवसेना शाखाप्रमुख महेश कुबल यांनी दिला आहे.

फोटो——-
पाडलोस : जखमी अवस्थेत असलेला कुत्रा.

You cannot copy content of this page