देवबाग येथील त्सुनामी आयलंड वाचविण्यासाठी उपाययोजना करावी

पर्यटन व्यावसायिकांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे मागणी

⚡मालवण ता.२७-: देवबाग येथील संगम पॉईंट नजीक कर्ली खाडीपात्रात त्सुनामीवेळी वाळूच्या थरामुळे तयार झालेले त्सुनामी आयलंड आता नष्ट होण्याच्या मार्गावर असून याचा फटका आयलंडवर चालणाऱ्या जलक्रीडा व्यवसायाला बसत असल्याने या प्रश्नी देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेत आयलंड वाचविण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना करण्याची मागणी केली. या प्रश्नी तज्ञ मंडळींशी चर्चा करून आयलंड बाबत शाश्वत स्वरूपात उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मंत्री राणे यांनी व्यवसायिकांना दिले.

यावेळी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन संस्थेचे तालुका अध्यक्ष अवी सामंत, पर्यटन व्यावसायिक मनोज खोबरेकर, रामा चोपडेकर यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

देवबाग तेथे कर्ली खाडी आणि समुद्रा मधील संगम दरम्यान त्सुनामी प्रलयात वाळूचा थर साचून एक बेट तयार झाले होते. या बेटाला त्सुनामी आयलंड म्हणून संबोधले जाते. या बेटावर देवबाग मधील स्थानिक पर्यटन व्यवसायिकानी जलक्रीडा पर्यटन व्यवसाय सुरू केला. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर जलक्रीडा होत असल्याने हे बेट पर्यटकांचे आकर्षण बनले होते. मात्र मागील काही वर्षात खाडीच्या प्रवाहात बदल झाल्यामुळे बेटाची धूप होऊन बेटाला धोका निर्माण झाला आहे. बेटावर पाण्याची पातळी वाढत असल्याने जलक्रीडा व्यवसाय संकटात आला आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत असून व जलक्रीडेवर रोजगारासाठी अवलंबून असलेल्या तरुणांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी कैफियत यावेळी सहदेव साळगावकर व मनोज खोबरेकर यांनी ना. राणे यांच्यासमोर मांडली. तात्पुरत्या स्वरूपात ड्रेझर द्वारे खाडीतील वाळू टाकून आयलंडची उंची वाढवणे याबाबत सद्यस्थितीत कार्यवाही व्हावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ना. राणे यांनी याप्रश्नी तज्ञांशी बोलून आयलंड टिकविण्याबाबत काही उपाययोजना करता येतील का हे पाहू, असे आश्वासन पर्यटन व्यावसायिकांना दिले.

You cannot copy content of this page