श्री. दिलिप गिरप ;
वेंगुर्लेत विभाच्या नावाने कार्डीयाक ऍम्ब्ब्युलन्स उपलब्ध व्हावी..
⚡वेंगुर्ला ता.१२-: विभा म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील मेडिकल क्षेत्रातील हिरा होता. एक फार्मासिस्ट असूनही त्याने शहरी -ग्रामीण खेड्यातील गरीब लोकांचा कैवारी म्हणून मिळविलेले नाव निश्चितच कायम राहणार आहे. वेंगुर्ला शहरासाठी- व्यापाऱ्यांसाठी त्याचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे विभासारखे नेतृत्व वेंगुर्ला शहरासाठी नव्याने आवश्यक आहे. त्याच्या अकाली एक्झिटने वेंगुर्ला शहराचे – रूरल एरियाचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशी श्रद्धांजली वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलिप उर्फ राजन गिरप यांनी आज (12 फेब्रुवारी )वेंगुर्ला येथील शोकसभेत वाहिली.
वेंगुर्ला व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक उर्फ विभा मदन खानोलकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना
विभा खानोलकर मित्रमंडळ व समस्त व्यापारी बांधवांतर्फे श्रद्धांजली वाहण्यासाठी आज गुरूवारी दि. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्वामिनी मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर,ओंकार विभा खानोलकर, नगरसेवक दाजी परब, सचिन शेट्ये, रिया केरकर, गौरी मराठे, शीतल आंगचेकर, प्रशांत आपटे, ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, गौरी माईणकर, आनंद पेडणेकर, मच्छीमार नेते वसंत तांडेल, वेंगुर्ला गॅस एजन्सीचे मालक ऍड. नंदन वेंगुर्लेकर, व्यापारी संघाचे सचिव राजन गावडे, उपाध्यक्ष राजू पांगम, व्यापारी संघांचे कार्यवाह नितीन वाळके, प्रदीप सावंत, भरत सातोसकर, व्यापारी संघांचे सदस्य गणेश अंधारी, पंकज शिरसाट, कपिल पोकळे, राजू पांगम,अमर दाभोलकर, विजय पांगम, माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष जनार्दन शेट्ये, माझा वेंगुर्लाचे माजी अध्यक्ष निलेश चेंदवणकर, बाळा शिरसाट, संजय पुनाळेकर, राकेश सापळे, दादासाहेब परुळेकर, सौ. परुळेकर, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. राजेश्वर उबाळे, ऍड. देवदत्त परुळेकर, तुळसचे सुधीर झाट्ये, पत्रकार दाजी नाईक व अजय गडेकर, श्री. सापळे, भाजपचे भूषण सारंग, आंबा – काजू बागायतदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, उभादांडा सरपंच व ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख निलेश चमणकर, बी. के. सी. असोसिएशन चे सतीश डूबळे, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, प्रा. डॉ. वसंतराव पाटोळे, संस्थेचे प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, सतीश डूबळे,कलावलय वेंगुर्लाचे अध्यक्ष बाळू खामकर,संजीव पुनाळेकर, ऍड. सूर्यकांत प्रभूखानोलकर, डॉ. गावस्कर, डॉ. साळगावकर, अँड. शाम गोडकर, बाळा खानोलकर,आनंद पेडणेकर, डॉ. संजीव लिंगवत, श्री. पडवळ, माजी नगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, डॉ. आनंद बांदेकर, जयराम वायंगणकर तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिन वालावलकर म्हणाले, विभा खानोलकर यांचे गेल्या 25 वर्षात व्यापारी संघांसाठी मोठे योगदान राहिले आहे. व्यापारी यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. व्यापारी व्यवसायात टिकला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील होते. वेंगुर्लातील मच्छीमार्केट, भाजीमार्केट होण्यासाठी त्यांचे फार मोठे योगदान राहिले आहे. त्यांचे कार्य पुढील कालावधीत चिरंतन टिकून राहील. यावेळी बोलताना ऍड. देवदत्त परुळेकर म्हणाले, व्यापारी संघाने आज अध्यक्ष गमावला असून आज त्यांचा पुत्र ओंकारचे फार मोठे नुकसान झाले आहे. तरी सुद्धा विभाने दिलेले नम्रपणाचे संस्कार, व्यापारातील मार्गदर्शन व फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट पाहता ओमकारची फार काळजी वाटत नाही. ओंकार यातून निश्चित बाहेर पडून फॅमिलीच्या सहकार्याने विभाचा वारसा निश्चित चालवेल, असेही ते म्हणाले. नितीन वाळके म्हणाले, ज्याप्रमाणे अन्नात मीठ आवश्यक आहे, त्याचप्रमाणे विभा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात मिठासारखा होता. त्यामुळे विभाच्या आठवणीचा जागर करणे हीच त्याच्या स्मृतीना आदरांजली ठरेल. यावेळी डॉ. राजेश्वर उबाळे म्हणाले, वेंगुर्लेच्या इतिहासात लिहिले जाईल असे कार्य म्हणजे विभा. वेंगुर्लात कार्डीयक एब्युलन्स असावी यासाठी प्रयत्न व्हावेत व ती पुढे विभा खानोलकर यांच्या नावाने चालवावी.ऍड. सूर्यकांत खानोलकर म्हणाले, गेल्या 50 वर्षात विभाने गोरगरीबासाठी केलेले कार्य यामुळे
विभाच्या आठवणीचा सुगंध दरवळत राहणार. जयप्रकाश चमणकर म्हणाले, विभा याने आरोग्यसेवेत जे कर्तृत्व दाखविले त्याची वेंगुर्ला शहरात ऐतिहासिक नोंद होईल.मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी श्रद्धांजली वाहताना आपला समाज, मच्छिमार बांधव ओंकार च्या दुःखात सहभागी असून कायम पाठीशी उभा राहील, असे सांगितले.नगरसेवक दाजी परब म्हणाले, विभाने कोरोना कालावधित गोरगरीब – मच्छिमार बांधवाना दिलेली सेवा महत्वाची राहिली आहे. ऍड. नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, नुकत्याच देवगड येथे झालेल्या व्यापारी मेळाव्यात विभाने मोलाची कामगिरी बजावली होती. विभाच्या जाण्याने वेंगुर्लावासिय नागरिकांची मोठी हानी झाली असून कुटुंबातील व्यक्ती गेल्याप्रमाणे जाणीव होत आहे.बाळा खानोलकर म्हणाले, विभा म्हणजे एक शालिन, स्वच्छ अंतरंग असणारा मेडिकल व्यवसायातील गरिबांचा व सर्वसामान्यांचा डॉकटर होता.गुड अंडरस्टँडिंग मुळे त्याची सामान्य माणसाशी नाळ जोडली गेली होती. त्याच्या कार्याचे चिरंतन स्मृती जपणे,हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल.वेंगुर्ला जनतेसाठी अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे विभा ही गरज होती, विभाचे बाळकडू प्रत्येक घरातील कुटुंबात गेले आहे,
अशा प्रकारे व्यापाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना वक्तव्य केले.तर शिरोडा येथील डॉ. साळगावकर म्हणाले, कार्डीयक ऍम्ब्यूलन्स ची वेंगुर्लाला नितांत गरज आहे. सीपीआर प्रमाणे अत्याधुनिक मेडिकल सुविधा शहरात होणे आवश्यक आहे. बदललेली जीवनशैली पाहता प्रत्येक व्यक्तीने मेडिकल चेकअप वेळोवेळी करणे आवश्यक आहे. फार्मासिस्ट म्हणून कोरोना कालावधीत विभाची तळमळ विशेष होती. यावेळी अन्य बहुसंख्य नागरिक – सहकारी – डॉकटर यांनी आपल्या विचारातून विभा खानोलकर यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सेंटलुक्स हॉस्पिटल कार्यान्वित झाल्यानंतर तीच विभा खानोलकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे यावेळी प्रशांत आपटे यांनी बोलताना सांगितले. मोठ्या संख्येने व्यापारी बांधव, नागरिक उपस्थित होते.
