ओरोस येथे टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती

मालवण (प्रतिनिधी)

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्यामार्फत देशात २० टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर करण्यात आली असून यातील एक सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. ओरोस येथे २०० कोटींचे टेक्नॉलॉजी सेंटर उभारण्यात येणार असून या सेंटर मध्ये आधुनिक यंत्रसामग्री असणार असून उद्योग वाढविण्यासाठी उद्योजकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मालवण येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

मालवण येथे निलरत्न या आपल्या निवासस्थानी आलेल्या केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका चिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, राजू परुळेकर, संतोष साटविलकर, संतोष गावकर, कृष्णानाथ तांडेल, सुहास हडकर, अविनाश सामंत, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी ना राणे म्हणाले, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्यामार्फत देशात यापूर्वी १८ टेक्नॉलॉजी सेंटर उभारली आहेत. आता देशात नवीन २० टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर केली असून यातील एक सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण मंजूर केले आहे. २०० कोटींचे हे सेंटर ओरोस येथे २० एकर जागेत उभारण्यात येणार आहे. या सेंटरच्या उभारणीबाबतच्या सर्व परवानगी व इतर बाबी पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाच्या नागरी विकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या सेंटरच्या उभारणीचे दीड वर्षात पूर्ण होऊन त्यानंतर हे सेंटर सुरू होणार आहे. या सेंटर द्वारे जिल्ह्यात उद्योजक निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सेंटर मध्ये आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असणार आहे. विविध प्रकारच्या उद्योगासाठी लागणारे साचे, साधने, यंत्रे या सेंटर मधून उद्योजकांना पुरविण्यात येणार आहेत. त्याद्वारे नवीन उद्योजकांना आपला उद्योग सुरू करणे सुलभ होणार आहे. तसेच स्थानिक उद्योजक, नवीन तरुण उद्योजक यांना उद्योग वाढीसाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे, जिल्ह्यातील उद्योजकांना या सेंटरचा फायदा होणार आहे, अशी माहितीही नारायण राणे यांनी दिली.

You cannot copy content of this page