मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ रोजी मालवणात मुक्कामास; कार्यकर्ते व नागरिकांशी साधणार संवाद

परशुराम उपरकर यांची माहिती

⚡मालवण ता.२४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून १ डिसेंबर रोजी ते मालवणात वास्तव्यास असणार आहेत. मालवणच्या भेटीत राज ठाकरे कार्यकर्त्यांशी बैठक घेणार असून पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांशीही चर्चा करणार आहेत, तसेच २ डिसेंबर रोजी सकाळी आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत दिली.

मालवण तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मालवण येथील हॉटेल विशाल मध्ये परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, माजी मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, माजी तालुकाध्यक्ष रामनाथ पराडकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, उपतालुकाध्यक्ष प्रशांत पराडकर व उदय गावडे, शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, महिला शहराध्यक्ष सौ. भारती वाघ, मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड व प्राजक्ता पार्टे, शहराध्यक्ष वैभव माणगावकर, साक्षी पार्टे, वैभव आजगांवकर, मिलिंद तेली, दर्शन सावजी, प्रतिक कुबल आदिंसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. उपरकर म्हणाले, राज ठाकरे १ डिसेंबर रोजी कुडाळ येथून मालवणला दाखल होणार आहेत. चौके, कुंभारमाठ येथे त्यांचे भव्य स्वागत होणार असून कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी मध्ये दुपारी १ वाजता ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघाटनात्मक कामाचा आढावा घेतील. त्यानंतर मालवण भरड नाक्यावर त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते ८ यावेळेत ते चिवला बीच येथे प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांशी चर्चा करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता आंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. तेथून ते कणकवली कडे मार्गस्थ होणार आहेत, असेही परशुराम उपरकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page